गडचिरोलीच्या तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:09 AM2021-01-20T04:09:27+5:302021-01-20T04:09:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून गडचिरोलीतून नागपुरात आलेल्या आणि येथे एका वृद्धाची प्रामाणिकपणे सेवा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून गडचिरोलीतून नागपुरात आलेल्या आणि येथे एका वृद्धाची प्रामाणिकपणे सेवा करून पूर्वतयारी करणाऱ्या एका तरुणाचा सोमवारी रात्री अचानक मृत्यू झाला. पीयूष विठ्ठल टेकाम (वय २९) असे मृताचे नाव आहे.
पीयूष अहेरी (जि. गडचिरोली)च्या हॉकी ग्राऊंडजवळ राहत होता. घरची परिस्थिती नाजूक असल्याने रोजगाराच्या शोधात तो नागपुरात आला होता. सरकारी खात्यातून निवृत्त झालेले वसंत वामनराव अभ्यंकर (८२) यांच्याकडे त्याला काळजीवाहक म्हणून काम मिळाले. वृद्ध अभ्यंकर यांची मुले विदेशात राहतात. ते येथे एकटेच असल्याने पीयूष त्यांची अगदी वडिलांप्रमाणे काळजी घेत होता. घरातील कामे करून तो प्रामाणिकपणे अभ्यंकर यांची सेवा करायचा. रोज रात्री जेवणाचा डबा आणून त्यांना जेऊ घालायचा. अभ्यंकरही त्याला घरच्या सदस्यासारखेच जपत होते. त्याचे पोलीस बनण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण व्हावे म्हणून त्याला सकाळ-सायंकाळ तयारी करण्यास प्रोत्साहित करायचे. सर्व व्यवस्थित होते. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री आठच्या सुमारास पीयूष जेवणाचा डबा घेऊन आला. किचनमधून थोड्या वेळाने काही तरी पडल्यासारखा आवाज आल्याने अभ्यंकर किचनमध्ये गेले. पीयूष खाली पडून होता. त्यांनी समोरच राहणाऱ्या एका डॉक्टरला बोलाविले. डॉक्टरांनी पीयूषला तपासले असता तो मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे बजाजनगर पोलिसांना कळविण्यात आले. ठाणेदार महेश चव्हाण, उपनिरीक्षक पी. के. पारखी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पीयूषचा मृतदेह मेडिकलमध्ये पाठविण्यात आला. अभ्यंकर यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---