प्राणघातक हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:08 AM2021-05-11T04:08:02+5:302021-05-11T04:08:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंकित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंकित ऊर्फ एवी चंद्रभान बोकडे (वय १८) असे मृताचे नाव आहे. तो एका हत्येच्या गुन्ह्यात आरोपी होता.
देविका ज्ञानेश्वर कळंबे (वय ४५), त्यांचे पती ज्ञानेश्वर कळंबे (वय ५०) तसेच त्यांचा मानलेला मुलगा राहुल गावकर आणि अंकित ऊर्फ एवी चंद्रभान बोकडे हे सर्व मॉडेल मिल चौकाजवळ २ मेच्या रात्री ७.३० च्या सुमारास भाजीपाला गोळा करीत होते. अचानक आरोपी सारंग उघडे, संकेत नाईक आणि त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करीत अंकित बोकडेवर कोयता, चाकू तसेच लोखंडी रॉडने हल्ला चढवला. मुलाच्या बचावासाठी धावलेल्या देविका यांनासुद्धा आरोपींनी जबर जखमी केले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सारंग उघडेचा भाऊ शैलेश याच्यासोबत आकाश आणि त्याच्या मित्रांचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. यावेळी आकाश आणि त्याच्या मित्रांनी शैलेशला बेदम मारहाण केली होती. गेल्या वर्षी सारंगच्या भावाची सात आरोपींनी हत्या केली होती. त्यात अंकित आरोपी होता. अल्पवयीन असल्याने त्याची लगेच सुधारगृहातुन सुटका झाली होती. गेल्या महिन्यातच त्याने वयाची १८ वर्षे पूर्ण केली. तेव्हापासून हत्येच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी शैलेशचा भाऊ सारंग संधी शोधत होता. अखेर त्याने साथीदारांसह अंकितवर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. गेल्या आठ दिवसापासून रुग्णालयात दाखल असलेल्या अंकितचा मृत्यू झाला. त्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी सोमवारी सकाळी आरोपींविरुद्ध हत्या करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपींना यापूर्वीच अटक झाली असून सध्या ते कारागृहात आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
---