आदिवासी गावात दररोज होतात मृत्यू : जिल्हा परिषदेने काय उपाययोजना केली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 08:53 PM2021-05-21T20:53:42+5:302021-05-21T20:55:18+5:30
Deaths occur daily in tribal villagesकोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आदिवासी भागात चांगलेच तांडव माजविले. गावागावात दररोज मृत्यू झाले. पॉझिटिव्ह निघणाऱ्यांना पाच दिवसांची औषध दिल्याशिवाय आरोग्य विभागाने काय केले? याचे उत्तर जिल्हा परिषदेने द्यावे. संतप्त झालेल्या आदिवासी भागातील जि.प. सदस्य शांता कुमरे यांनी सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद प्रशासनासह पदाधिकाऱ्यांवरही नाराजी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आदिवासी भागात चांगलेच तांडव माजविले. गावागावात दररोज मृत्यू झाले. पॉझिटिव्ह निघणाऱ्यांना पाच दिवसांची औषध दिल्याशिवाय आरोग्य विभागाने काय केले? याचे उत्तर जिल्हा परिषदेने द्यावे. संतप्त झालेल्या आदिवासी भागातील जि.प. सदस्य शांता कुमरे यांनी सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद प्रशासनासह पदाधिकाऱ्यांवरही नाराजी व्यक्त केली. आदिवासी दुर्गम भागात कोरोना हाताळण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आभासी पद्धतीने सुरू झाली. कोरोनावर उपाययोजनेचा विषय सुरू असताना, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढणे सुरू होते. अशात सत्ताधारी सदस्य प्रकाश खापरे विरोधकांना चूप बसा, असे सांगून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत होते. ही ताणाताणी सुरू असतानाच, ज्येष्ठ सदस्य शांता कुमरे यांनी संतप्त होऊ खापरेंना चांगलीच चपराक लावली. विरोधकांना बोलू द्या, त्यांचा आवाज दाबू नका, असे वक्तव्य करून सत्ताधाऱ्यांनाच घरचा अहेर दिला. सभेनंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी हा भाग आदिवासीबहुल आहे. कोलितमारा, ढवळापूर, सुवरधरा, चारगाव, सालई, अंबाझरी, पथराई, देवलापार, करवाई या गावांमध्ये कोरोनाने अनेकांचे जीव गेले आहे. कोरोनाची टेस्ट करण्यासाठी या गावातील लोकांना २५ किलोमीटर जावे लागते आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर गृहविलगीकरणाचा सल्ला आणि ५ दिवसांच्या व्हिटॅमिनच्या गोळ्या हाच उपचार आरोग्य विभागाचा आहे. कोविड केअर सेंटर नाही. गृहविलगीकरणातील रुग्णांची नियमित तपासणी नाही. गंभीर झालेल्या रुग्णांवर उपचाराची अत्याधुनिक सोय नाही. आरोग्य केंद्रामध्ये मनुष्यबळ नाही. त्यामुळे दररोजचे मृत्यू आदिवासी लोकांनी अनुभवले आहे. आजही परिस्थिती बदलली नाही. आदिवासी भागाकडे लक्ष न दिल्यास तिसऱ्या लाटेत हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही.
भुईनिंबाचा पाला खाऊन झाले बरे
आरोग्य यंत्रणाच कुचकामी ठरली. औषधोपचार नाही. रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका नाही. त्यामुळे आरोग्य विभागावर लोकांचा विश्वास उडाला आहे. आदिवासी भागात अनेक जण भुईनिंबाचा पाला खाऊन बरे झाल्याचे त्यांनी सांगितले.
लसीकरणापूर्वी करा कोरोनाची टेस्ट
५ एप्रिलपासून आदिवासी भागामध्ये लसीकरणाला सुरूवात झाली. लस घेतल्यानंतर कोरोना होतो, अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे लसीकरणासाठी लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आजही तशीच स्थिती आहे. प्रशासनाने आता लसीकरणापूर्वी कोरोनाचे टेस्ट करूनच लस द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही
मी स्वत: कोरोना पॉझिटिव्ह आले. मला केवळ ५ दिवसांच्या औषधी देऊन घरात राहण्याचा सल्ला दिला. नंतर कुणी तपासायला आले नाही. लोकप्रतिनिधीची अशी अवस्था असेल, तर जनतेचे काय हाल असतील, त्यामुळेच सभेत संतप्त होऊन आदिवासींची परिस्थिती प्रशासनापुढे मांडली.