सीताबर्डीत पोलीस हॉकर्समध्ये वाद
By admin | Published: February 21, 2017 02:04 AM2017-02-21T02:04:24+5:302017-02-21T02:04:24+5:30
अतिक्रमणविरोधी कारवाई करणाऱ्या पोलिसासोबत वाद झाल्यानंतर एका सहायक पोलीस निरीक्षकाने चप्पल विक्रेत्याला भररस्त्यावर बदडले.
तरुणाला मारहाण : आरोप-प्रत्यारोपाने तणाव
नागपूर : अतिक्रमणविरोधी कारवाई करणाऱ्या पोलिसासोबत वाद झाल्यानंतर एका सहायक पोलीस निरीक्षकाने चप्पल विक्रेत्याला भररस्त्यावर बदडले. सीताबर्डीतील गांधीजींच्या पुतळ्याजवळ सोमवारी दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी अमिनुद्दीन बसुरीद्दीन चव्हाण (वय २७) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार घेण्यास नकार दिल्याने सीताबर्डीतील हॉकर्स संतप्त झाले होते.
अमिनुद्दीन हा सीताबर्डीत रस्त्यावर चपला विकतो. दुपारी १.२० च्या सुमारास वाहतूक शाखेचे हवालदार अजयसिंग विजयसिंग ठाकूर (वय ४७) हे आपल्या सहकाऱ्यांसह अतिक्रमण हटाव कारवाई करीत असताना त्यांचा अमिनुद्दीन आणि त्याच्या दोन साथीदारांसोबत वाद झाला. त्यानंतर ठाकूर यांनी सीताबर्डी ठाण्यात माहिती दिली. ठाण्यातून आलेल्या एका सहायक पोलीस निरीक्षकाने अमिनुद्दीनला रस्त्यावरून बदडत ठाण्यात नेले. यामुळे बाजारात तणाव निर्माण झाला. मोठ्या संख्येत हॉकर्स पोलीस ठाण्यात पोहचले. तेथे सहायक पोलीस निरीक्षक येलकेलवार यांनी ठाकूरच्या तक्रारीवरून अमिनुद्दीन आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपी अमिनुद्दीनला अटक करण्यात आली. ठाण्यात पोहचलेल्या हॉकर्स संघटनेचे कुणाल यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी मात्र त्याला नकार दिला. यामुळे हॉकर्समध्ये तणाव निर्माण झाला. मोठ्या संख्येत ठाण्यासमोर जमलेले हॉकर्स पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, ही मागणी घेऊन सायंकाळपर्यंत उभे होते. (प्रतिनिधी)