कर्जमुक्ती योजना : आधार क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांच्या लागणार याद्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:26 AM2020-01-03T00:26:32+5:302020-01-03T00:27:08+5:30
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज भरण्याची गरज नाही. बँकाकडून थकबाकीदारांची यादी घेण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नाही, अशांची यादी सात दिवसात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज भरण्याची गरज नाही. बँकाकडून थकबाकीदारांची यादी घेण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नाही, अशांची यादी सात दिवसात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सहाकार विभागाच्या प्रधान सचिव यांनी कर्जमुक्तीबाबत व्ही.सी.च्या माध्यमातून महसूल, सहाकर व ग्राम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी सर्व विभागीय आयुक्त उपनिबंधक उपस्थित होते. प्रधान सचिव यांंनी कर्जमक्तीबाबतच्या योजना व ती राबविण्याबाबतची माहिती प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिली. सरकारच्या कर्जमुक्ती योजनेनुसार १ एप्रिल ते ३१ मार्च २०१९ पर्यंत कर्ज घेतलेले व ३० सप्टेंबरपर्यंत दोन लाखांपर्यत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या लाभासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज शेतकऱ्यांना भरावा लागणार नाही आहे. बँकेला एक फार्म देण्यात आला आहे. त्यांच्याकडून याची माहिती सरकारला देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नाही, अशांची यादी सात दिवसात प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रधान सचिवांनी दिल्याची माहिती आहे. कर्जाची रक्कम गृहीत धरता अनेकांची थकबाकी ही २ लाखांच्या वर जाणार असल्याचे समजते. मात्र पहिल्या टप्प्यात फक्त दोन लाखांपर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचीच माहिती गोळा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याची माहिती आहे. या योजनेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीही गठित करण्यात आली आहे. सर्व बँकांना आठ दिवसात शेतकऱ्यांची माहिती पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्याचे सांगितले जाते.