नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटींची कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 09:22 PM2019-01-14T21:22:57+5:302019-01-14T21:24:47+5:30
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ५८ हजार शेतकऱ्यांना ५९२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ५८ हजार शेतकऱ्यांना ५९२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे २९,१०५ शेतकऱ्यांना २१३.९१ कोटींची कर्जमाफी झाली असून, ग्रामीण बँकेमार्फत १२७७ शेतकऱ्यांच्या खात्यात ४.८४ कोटी रुपये जमा करण्यात आले. राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत ३७,७७८ शेतकऱ्यांना २०५.८५ कोटींचे कर्ज माफ झाले आहे.
नागपूर जिल्ह्यात एकूण ४९ हजार शेतकऱ्यांना ३५.६३ कोटी, प्रोत्साहनपर १३,५३७ शेतकºयांना ३० कोटी, ओटीएसअंतर्गत ५,२७२ शेतकऱ्यांना ५८ कोटी असे एकूण ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे.
नागपूर जिल्हा खरीप पीक कर्ज वाटपांतर्गत डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ३७०० लाख, राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत ५४,२०३ लाख, ग्रामीण बँकेमार्फत १३२९ लाख, असे एकूण ५९२.३२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
संत्रा नर्सरी प्रशिक्षणासाठी २५ लक्ष रुपये
जिल्ह्यातील संत्रा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासोबतच संत्र्याच्या कलमा तयार करण्यासाठी संत्रा नर्सरी प्रशिक्षण आयोजित करावे, अशी सूचना सदस्यांनी केली असता, संत्रा नर्सरी प्रशिक्षणासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तीर्थस्थळ विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पशुसंवर्धन, आरोग्य विभागाच्या विविध योजना, दुग्धविकास तसेच इतर योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
दीक्षाभूमी विकासासाठी मंजूर १०० कोटी निधीपैकी ५० कोटी निधी ड्रॅगन पॅलेस, ताजबाग यासाठीचा विकास निधी वितरित करण्यात आला आहे.मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते विकास योजनेंतर्गत ६००किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले असून, या रस्त्यांच्या बांधकामालाही प्राधान्य द्यावे, अशी सूचना करण्यात आली. जिल्हा नियोजन मंडळातर्फे शहरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, चार स्मशानभूमीवर पर्यावरणपूरक शवदाहिनी बसविण्यात येत आहे यापैकी मोक्षधाम येथे २ कोटी ४० लक्ष रुपये खर्चास मान्यता देण्यात आली असून, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येत असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त भागातील कामांना प्राधान्य
जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागातील कामांना प्राधान्य देण्यासाठी सोबत शैक्षणिक शुल्क माफ करणे तसेच पीक विमा योजनेचा लाभ देण्यासंदर्भातही यावेळी निर्णय घेण्यात आला.