नागपुरात अवैध सावकाराने घेतला कर्जदाराचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 08:26 PM2018-02-08T20:26:25+5:302018-02-08T20:29:11+5:30
अवैध सावकार आणि त्याच्या साथीदाराने ६५ हजारांच्या वसुलीसाठी कर्जदारामागे सारखा तगादा लावला. त्याला वारंवार अपमानित करून धमकी देऊ लागला. त्याच्या धमक्यामुळे प्रचंड दडपण आल्यामुळे जुगराम बळीराम लांजेवार (वय ४८) यांनी गळफास लावून आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध सावकार आणि त्याच्या साथीदाराने ६५ हजारांच्या वसुलीसाठी कर्जदारामागे सारखा तगादा लावला. त्याला वारंवार अपमानित करून धमकी देऊ लागला. त्याच्या धमक्यामुळे प्रचंड दडपण आल्यामुळे जुगराम बळीराम लांजेवार (वय ४८) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी अवैध सावकारी करणारा आरोपी, त्याची पत्नी आणि दोन साथीदारांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.
दिघोरी नाका परिसरात राहणारे लांजेवार यांनी इमरान मसूद खान (वय ३८, रा. अमन अपार्टमेंट छावणी, सदर) तसेच वैरागडे नामक व्यक्तीकडून प्रत्येकी ४० असे ८० हजारांचे कर्ज घेतले होते. त्यातील २५ हजार रुपये लांजेवार यांनी परतही केले होते. आर्थिक कोंडीमुळे उर्वरित रक्कम परत करण्यास विलंब होत असल्यामुळे आरोपी इमरान खान, त्याची पत्नी आणि दोन साथीदार वारंवार लांजेवार तसेच त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून त्रास देत होते. त्यांच्या घरी जाऊन अपमानित करीत होते. तातडीने व्याजासह रक्कम परत केली नाही तर तुला घरून उचलून नेईन, तुझ्या नोकरीच्या ठिकाणी तसेच ज्या गावचा तू मूळ निवासी आहे, त्या गावात नेऊन मारेन, अशी धमकी देत होते. त्यामुळे लांजेवार कमालीचे दडपणात आले होते. वारंवार होणारा अपमान आणि आरोपींचा त्रास असह्य झाल्यामुळे २८ ते २९ च्या रात्रीदरम्यान त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. प्रारंभी या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, लांजेवार यांची पत्नी सुनीता जुगराम लांजेवार यांनी जुगराम लांजेवार यांनी आरोपी इमरान, त्याची पत्नी आणि साथीदारांच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याची तक्रार हुडकेश्वर ठाण्यात नोंदविली. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक झालेली नव्हती.