हा व्हॅक्सिन घोटाळा आहे का? मृत व्यक्तीचे लसीकरण; ‘लोकमत’च्या वृत्ताने सर्वत्र खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 12:59 PM2022-12-07T12:59:57+5:302022-12-07T13:07:30+5:30

दीड वर्षापूर्वी निधन झालेल्या व्यक्तीने कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची लस घेतल्याचा मेसेज आल्याने त्या व्यक्तीचे कुटुंबिय चक्रावून गेले.

deceased took corona vaccine; Is this a vaccine scam? upsurge after the news published | हा व्हॅक्सिन घोटाळा आहे का? मृत व्यक्तीचे लसीकरण; ‘लोकमत’च्या वृत्ताने सर्वत्र खळबळ

हा व्हॅक्सिन घोटाळा आहे का? मृत व्यक्तीचे लसीकरण; ‘लोकमत’च्या वृत्ताने सर्वत्र खळबळ

Next

नागपूर : दीड वर्षापूर्वी मृत झालेले नागपुरातील एका आजोबांचे कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ठळकपणे प्रकाशित केल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. हा लसीकरण घोटाळ्याचा प्रकार असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रियाही अनेकांनी ‘लोकमत’कडे नोंदवली आहे.

नागपुरातील लालगंज परिसरात राहणारे शिवाजी हिरामन डांगे या मृत व्यक्तीबाबत हा प्रकार घडला आहे. डांगे यांचे २७ जुलै २०२१ ला निधन झाले. त्याला आता दीड वर्ष झाले असताना मृत डांगे यांचा नातू निखिल याच्या मोबाइलवर सोमवारी दुपारी एक मेसेज आला. त्यात शिवाजी हिरामन डांगे यांच्या कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ५ डिसेंबर २०२२ ला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे यशस्वीरित्या पूर्ण झाला असल्याचे नमूद होते.

अहो आश्चर्यम! नागपूरच्या मृत व्यक्तीने दीड वर्षानंतर गडहिंग्लज गाठले अन् कोरोनाची लस घेतली

निखिलने शहानिशा करण्यासाठी मेसेजवर दिलेली लिंक ओपन केली असता डांगे यांच्या कोविड व्हॅक्सिनचे प्रमाणपत्र त्याला मिळाले. या धक्कादायक प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात ठळकपणे प्रकाशित केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. अनेक वृत्तवाहिन्या आणि पोर्टल्सनेही हे वृत्त उचलून धरले. इकडे संबंधित प्रतिनिधीकडेही अनेक फोन आले. अनेकांनी हा लसीकरण घोटाळा असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया नोंदवली.

कागदपत्रे कोल्हापुरात कशी पोहाेचली?

आधार कार्डसारखे महत्त्वपूर्ण दस्तावेज दाखविल्याशिवाय संबंधित व्यक्तीला कोविडची लस दिली जात नाही. या प्रकरणात व्यक्तीच जिवंत नाही. त्यामुळे त्यांनी स्वत: जाऊन लस घेण्याचा प्रश्नच नाही. मात्र, एखाद्या व्यक्तीचे कागदपत्र रेकॉर्डवर घेऊन त्याला कागदोपत्री लस देण्याचे गैरप्रकार घडल्याची ओरड अनेकदा झाली. हा त्यातीलच प्रकार असावा. मात्र, डांगे यांचे कागदपत्र कोल्हापूर जिल्ह्यात कसे पोहाेचले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहानिशा करण्यात येईल : डीएचओ

लसीकरणाच्या या राष्ट्रीय कार्यक्रमातही घोटाळा होत असल्याची शंका अनेक अधिकाऱ्यांनीही व्यक्त केली. त्यामुळे या संबंधाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर, पुढचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: deceased took corona vaccine; Is this a vaccine scam? upsurge after the news published

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.