समृद्धीच्या डिसेंबरच्या मुहूर्ताचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:10 AM2021-08-22T04:10:59+5:302021-08-22T04:10:59+5:30
लोकमत संडे स्पेशल एंट्री पॉइंटलाच महामार्गाच्या कामाची गती मंद शिवमडका ते खडकी ३१ किमीचा टापू पूर्ण होणे अवघड जागोजागी ...
लोकमत संडे स्पेशल
एंट्री पॉइंटलाच महामार्गाच्या कामाची गती मंद
शिवमडका ते खडकी ३१ किमीचा टापू पूर्ण होणे अवघड
जागोजागी मातीचे ढिगारे, तुकड्यातुकड्यांचा रस्ता
लोकमत ऑन द स्पॉट
आनंद डेकाटे/कमल शर्मा
नागपूर : महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पायाभूत प्रकल्प समजला जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी टापू येत्या डिसेंबरमध्ये वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावा सार्वजनिक उपक्रमांचे बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केला असला तरी प्रत्यक्षात नागपूरकरांना या नव्या मुहूर्ताचा लाभ घेता येणार नाही. शहराच्या बाह्य रिंगरोडवरील शिवमडका ते वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील खडकी या ३१ किलोमीटरचे काम चार महिन्यांत पूर्ण होण्याची अजिबात शक्यता नाही.
राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर जोडणाऱ्या ७०१ किमी लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या टापूबद्दल आधी महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तो हुकला. एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नागपुरात नवा मुहूर्त जाहीर केला. त्या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी लोकमत चमूने शनिवारी या महामार्गाच्या प्रारंभबिंदू परिसराची पाहणी केली.
--------------
समृद्धीच्या वाटेने शिवमडका ते खडकी
* समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉइंटलाच रस्त्याचे दर्शन नाही, मातीचे ढिगारे अधिक, नुसतेच खोदकाम, उड्डाणपुलाचे नुसतेच सांगाडे, रस्त्याच्या एका तुकड्यापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचणे मुश्कील, कधी जुन्याच रस्त्याचा वापर तर कधी तेही अशक्य, अशी हिंगणा तालुक्यातील शिवमडका ते वर्धा जिल्ह्यातील खडकी या महत्त्वाच्या टप्प्यातील कामाची दयनीय स्थिती आहे.
* जामठ्याजवळ शिवमडका येथे एक वर्तुळाकार प्रारंभबिंदू तयार केला जात आहे. ते काम अपूर्ण आहे. तिथून एक रस्ता कॅन्सर इन्स्टिट्यूटकडे, तर दुसरा हिंगण्याकडे जातो. त्या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांची अवस्था चिंताजनक आहे.
* समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉईंटपासून थोड्या अंतरावरच रस्ता दिसणे बंद होते. जागोजागी मातीचे ढिगारेच दिसतात. एक किमी अंतरावरील गुमगावला बाजूच्या जुन्या रस्त्याने जावे लागते. पुढे काही ठिकाणी अधूनमधून पूर्ण झालेल्या समृद्धी महामार्गाचे काम दिसते.
* गुमगाव ते वडगाव (गुजर) या गावापर्यंतच्या रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय आहे. चिखलातच रस्ता शोधावा लागतो. वडगाव गुजर ते नागझरीपर्यंतचा रस्ता एका बाजूने तयार आहे. दुसऱ्या बाजूचे काम सुरू आहे.
* नागझरी ते कान्होलीबारा, गांधी खापरीपर्यंतही काही ठिकाणी रस्ता, तर काही ठिकाणी अपूर्ण कामे असे चित्र आहे. समृद्धी महामार्गाला टाकळघाट व बुटीबोरीशी जोडणाऱ्या रस्त्याची स्थितीही दयनीय आहे. ठिकठिकाणी तो खोदून ठेवला आहे.
* सुकळी घारापुरेपासून जवळपास दोन किलोमीटरचा तुकडा चांगला आहे. हाच रस्ता पुढे वर्धा जिल्ह्यातील खडकीपर्यंत जातो. तिकडे मात्र स्थिती चांगली नाही. अर्धवट अवस्थेतील पुलांखाली पावसाचे पाणी जागोजागी साचले असल्याने वाहतूक सुरू होण्यापूर्वीच रस्ता खराब होण्याची भीती आहे.
* एकनाथ शिंदे यांनी या टापूमध्ये केवळ २० टक्के काम शिल्लक राहिल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात फक्त अंदाजे ४० टक्के कामच झाल्याचे दिसते. याचा अर्थ जे काम २०१५ पासून सहा वर्षांत झाले नाही, ते चार महिन्यांत कसे होणार?
------------
बॉक्स
मजुरांना ४७० ऐवजी मिळतात ३०० रुपये
वडगाव (गुजर) गावाजवळ समृद्धी महामार्गावर मातीकाम करणाऱ्या काही मजुरांनी कमी मजुरीची व्यथा मांडली. त्यांनी सांगितले की, रोजच्या मजुरीचा शासकीय दर ४७० रुपये असताना आम्हाला केवळ ३०० रुपये रोज मिळतात.