ठरलं... पंतप्रधान माेदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 08:49 AM2022-12-01T08:49:46+5:302022-12-01T10:43:44+5:30
३ आठवड्यांत दोनदा नागपूर दौरा
नागपूर : बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नागपुरात उद्घाटन होणार आहे. याचवेळी नागपूर मेट्रोच्या रिच-२ (कामठी मार्ग) व रिच-४ (सेंट्रल एव्हेन्यू) या मार्गांचेदेखील उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील. पंतप्रधान नागपूरला येण्यापूर्वी नागपूर आणि पुणे मेट्रो तसेच नाशिक मेट्रो निओच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकार मंजुरी देण्याची दाट शक्यता आहे. उद्घाटनाअगोदर नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग पूर्णत: तयार होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष सहव्यवस्थापकीय संचालक (व्हीसीएमडी) राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले.
३ आठवड्यांत दोनदा नागपूर दौरा
इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान ३ जानेवारीला नागपुरात येणार आहेत. त्यावेळी समृद्धी आणि नागपूर मेट्रो सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधानांनी तीन आठवड्यांच्या कालावधीत दोनदा शहरात येण्याचा निर्णय घेतला आहे.
असा असेल दौरा
n पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून बैठकांची सत्रे सुरू आहेत.
n सुरक्षाव्यवस्था व इतर प्रशासकीय व्यवस्थांचा आढावा घेण्यात येत आहे.
n पंतप्रधान कार्यालयाकडून नेमका कार्यक्रम लवकरच येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.