‘५०-५०’ परीक्षा प्रणालीबाबत आज निर्णय
By admin | Published: June 6, 2017 02:14 AM2017-06-06T02:14:05+5:302017-06-06T02:14:05+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ‘ड्रीम’ असलेली ‘५०-५०’ परीक्षा प्रणाली यंदापासून लागू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत.
नागपूर विद्यापीठ : महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बोलविली बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ‘ड्रीम’ असलेली ‘५०-५०’ परीक्षा प्रणाली यंदापासून लागू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. याची नियमावलीदेखील लवकरच तयार होणार आहे. मात्र या प्रणालीला शहरी भागातील अनेक महाविद्यालयांकडून विरोध होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात नागपूर विद्यापीठाने गैरव्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांची मंगळवारी बैठक बोलाविली आहे. या परीक्षा प्रणालीबाबत या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली प्रशासनासाठी सर्वात मोठी समस्या झाली आहे. त्यातच पदवी अभ्यासक्रमांनादेखील सत्र प्रणाली लागू झाल्यामुळे परीक्षा विभागावरील ताण प्रचंड वाढला आहे. हा ताण कमी व्हावा यासाठी महाविद्यालयांतदेखील परीक्षा सुरू करण्याचा कुलगुरूंचा मानस होता. यासंदर्भातील प्रस्ताव विद्वत्त परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात आला. याला मंजुरी देण्यात आली होती.
या प्रणालीत एका सत्राची परीक्षा विद्यापीठ तर एका सत्राची परीक्षा महाविद्यालय घेणार आहे. विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल हा विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवर ठरणार असल्याने गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
मात्र संबंधित प्रणालीमुळे महाविद्यालयांवरील ताण वाढणार आहे. ‘सेशनल’ परीक्षा घेतल्यानंतर महाविद्यालयांना संबंधित परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे प्राध्यापकांना दुप्पट काम करावे लागणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांकडून या प्रणालीला विरोध करण्यात येत आहे. विशेषत: गैरव्यावसायिक महाविद्यालयांकडून नाराजीचा सूर आहे. यासंदर्भात नेमका तोडगा काढण्यासाठी व परीक्षेची अंतिम रूपरेषा ठरविण्यासाठी मंगळवारी दुपारी प्राचार्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सत्रप्रणाली, परीक्षा पद्धती यांच्यासोबतच परीक्षेची नेमकी ‘स्कीम’ इत्यादींबाबत चर्चा होईल. मंगळवारी याबाबत निर्णयदेखील होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.