नागपुरातील मेयो इस्पितळात डीन, सुपरमध्ये ओएसडी नियुक्तीवर दोन आठवड्यांत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:25 PM2018-01-22T22:25:21+5:302018-01-22T22:26:42+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे नियमित अधिष्ठाता (डीन) आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी (ओएसडी) यांची नियुक्ती दोन आठवड्यांत केली जाईल अशी ग्वाही राज्य शासनाने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे नियमित अधिष्ठाता (डीन) आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी (ओएसडी) यांची नियुक्ती दोन आठवड्यांत केली जाईल अशी ग्वाही राज्य शासनाने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १८ अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांची खरेदी करण्यासाठी गेल्या आॅक्टोबरमध्ये जिल्हा नियोजन समिती निधीतून ३ कोटी २५ लाख ९७ हजार ४८३ रुपये मंजूर झाले आहेत. परंतु, अद्याप उपकरणांची खरेदी करण्यात आली नाही. यासंदर्भात दोन आठवड्यांत निविदा नोटीस प्रकाशित केली जाईल असे शासनाने सांगितले. तसेच, मेयोतील नवीन शस्त्रक्रिया विभागांत एसी बसविण्याची व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रियाही लवकरच पूर्ण करण्यात येईल असे शासनाने स्पष्ट केले. त्यानंतर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा शासनाला आदेश देऊन प्रकरणावर २५ जानेवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.
शासकीय रुग्णालयांच्या विकासाविषयी २००० सालापासून न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहेत. दरम्यान, आतापर्यंत विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील अनेक प्रश्न न्यायालयासमक्ष मांडण्यात आलेत. न्यायालयाच्या आदेशांमुळे त्यापैकी बरेच प्रश्न सुटले आहेत. या प्रकरणात अॅड. अनुप गिल्डा न्यायालय मित्र आहेत. शासनातर्फे अॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.