पेंच मुख्यालय पुन्हा नागपुरात आणण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:08 AM2018-09-18T01:08:40+5:302018-09-18T01:09:52+5:30
पेंच राष्ट्रीय उद्यान व मानसिंह देव अभयारण्याचे रामटेक येथील मुख्यालय परत नागपुरात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच राष्ट्रीय उद्यान व मानसिंह देव अभयारण्याचे रामटेक येथील मुख्यालय परत नागपुरात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सूत्रानुसार पेंच आणि मानसिंह देव अभयारण्याावर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने उपसंचालक कार्यालय रामटेक येथे स्थापित करण्याचा निर्णय सप्टेंबर २०१३ मध्ये घेण्यात आला होता. हे कार्यालय रामटेकमध्ये सुद्धा गेले. परंतु प्रशासकीय कामांसाठी अनेक अडचणी येऊ लागल्या. पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत तोतलाडोह धरणातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी शासकीय कार्यालयात समन्वय ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांच्या संपर्कात राहावे लागते. या उद्देशाने पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कार्यालय नगपुरात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव पुन्हा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) कार्यालयाला देण्यात आले होते. हा प्रस्ताव वन मुख्यालयाने सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. अखेर वन व महसूल मंत्रालयाने पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कार्यालय रामटेक येथून नागपूरला स्थानांतरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे.