महापौरांद्वारे लस खरेदी करण्याचा निर्णय सवंग लोकप्रियतेसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:08 AM2021-05-08T04:08:41+5:302021-05-08T04:08:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपाद्वारे लस खरेदी करणार, अशा प्रकारचा निर्णय जाहीर केला व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपाद्वारे लस खरेदी करणार, अशा प्रकारचा निर्णय जाहीर केला व लोकप्रतिनिधींनी लस खरेदीसाठी त्यांच्या विकास निधीतून निधी द्यावा, असे आवाहन केले. महापौरांचा हा निर्णय केवळ सवंग लोकप्रियतेसाठी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश महासचिव व नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी केली आहे. लसीचा तुटवडा हा निधीअभावी निर्माण झाला? की अनउपलब्धतेमुळे निर्माण झाला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
कुठल्याही साथरोगावर लसीकरणाचे धोरण हे केंद्र शासन निश्चित करते व केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्य शासनाला लस उपलब्ध होते. सध्या केंद्रातील मोदी सरकारच्या लसलकवा धोरणामुळे संपूर्ण देशात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मोदी सरकारने जवळपास सहा कोटी डोस परदेशात पाठविण्याचा निर्णय देशाला घातक ठरला. त्यावर उपाययोजना म्हणून राज्य सरकारने जागतिक निविदा काढून लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार लसीवर लागणारा संपूर्ण खर्च करण्यास तयार आहे, असे असताना मनपाद्वारे लस खरेदी करण्यात येत असल्याची महापौरांची घोषणा म्हणजे मोदी सरकारचे अपयश लपविण्याचा प्रयत्न होय, अशी टीकाही त्यांनी केली.