हिवाळी अधिवेशनासाठी आता 'प्लॅन बी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 10:38 AM2021-11-12T10:38:06+5:302021-11-12T10:45:22+5:30
हिवाळी अधिवेशन नागपुरात करण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. तरीही कोविड संक्रमणामुळे संभ्रम कायम आहे. दुसरीकडे निर्णय न झाल्याने अधिकाऱ्यांचे टेंशन वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोव्हेंबर महिना अर्ध्यावर आला आहे; परंतु विधिमंडळाने हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात होणार की मुंबईत, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. अर्थसंकल्पाच्या शेवटच्या दिवशी हिवाळी अधिवेशन नागपुरात करण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. तरीही कोविड संक्रमणामुळे संभ्रम कायम आहे. दुसरीकडे निर्णय न झाल्याने अधिकाऱ्यांचे टेंशन वाढले आहे. तयारीसंदर्भात 'प्लॅन बी'वर विचार सुरू झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी विधानभवन, आमदार निवास, रविभवन, नागभवनासह सर्व इमारती २५ नोव्हेंबरपर्यंत परंपरेनुसार विधिमंडळ सचिवालयाकडे सोपवाव्या लागतात; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने आतापर्यंत प्रत्यक्षात कामालाच सुरुवात केलेली नाही. निविदा जारी झाल्या आहेत; परंतु अधिवेशनाबाबत संभ्रम असल्याने वर्क ऑर्डर जारी झालेले नाही. असे सांगितले जाते की, काम सुरू झाले आणि अधिवेशन मुंबईत करण्याचा निर्णय झाला, तर विनाकारण खर्च वाढेल. नाव न छापण्याच्या अटीवर अधिकारी स्पष्ट सांगतात की, दोन महिन्यांची कामे १५ दिवसांत करणे कुठल्याही परिस्थितीत शक्य नाही. त्यामुळे आता सर्व कामे होऊ शकणार नाहीत. केवळ तीच कामे होऊ शकतील जी अत्यावश्यक आहेत. दुसरीकडे आरोग्य विभागानेही कोविड संक्रमणाच्या सावटात होऊ घातलेल्या या अधिवेशनासंदर्भात कुठलेही ठोस पाऊल उचलल्याचे दिसून येत नाही.
मुंबई की नागपूर : चर्चांना उधाण
हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीला घ्यायचा आहे. त्यामुळे समितीच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. अधिवेशनासाठी मोठ्या प्रमाणावर लोक बाहेरून येणार असल्याने कोविड संक्रमण वाढण्याचा धोका, तसेच अर्धवट अवस्थेतील तयारीचा हवाला देत अधिवेशन मुंबईत होणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
कर्मचाऱ्यांची तात्पुरती भरती
विविध चर्चांदरम्यान अधिवेशनासंदर्भात प्रशासनिक स्तरावर तयारीला सुरुवात झाली आहे. यात कर्मचाऱ्यांची तात्पुरती भर्तीचाही समावेश आहे. सचिवालयात लिपिक, टायपिस्ट, शिपाई, संदेशवाहकांची तात्पुरती भरती होणार आहे. यासाठी इच्छुकांना जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क करण्यास सांगण्यात आले आहे, तसेच २६ व २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता विधानभवनात परीक्षा होईल. थेट परीक्षेलाही बसता येईल.