अटलजींच्या स्वप्नातील राष्ट्र बनविण्याचा संकल्प करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:37 PM2018-08-25T22:37:46+5:302018-08-25T22:38:46+5:30
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी हे देशातील सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे नेते होते. राष्ट्रवाद व राष्ट्रप्रेमासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. पराभवामुळे ते व्यथित झाले नाही, लढत राहिले. २१ व्या शतकात भारताला जगातील एक शक्तिशाली राष्ट्र बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते. भारत जगातील विकसित राष्ट्र होत नाही तोपर्यत कार्यरत राहण्याचा असा संकल्प करा, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी हे देशातील सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे नेते होते. राष्ट्रवाद व राष्ट्रप्रेमासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. पराभवामुळे ते व्यथित झाले नाही, लढत राहिले. २१ व्या शतकात भारताला जगातील एक शक्तिशाली राष्ट्र बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते. भारत जगातील विकसित राष्ट्र होत नाही तोपर्यत कार्यरत राहण्याचा असा संकल्प करा, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपातर्फे रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, विकास कुंभारे, सुधीर पारवे, गिरीश व्यास, समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी आदी उपस्थित होेते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक केला त्यावेळी विरोधकांनी श्रेय घेत असल्याची टीका केली. आपले सैन्य सक्षम आहे. परंतु आजवरच्या सत्ताधाऱ्यांत ती हिंमत नव्हती. जागतिक दबावाला न जुमानता वाजपेयी यांनी अणुचाचणी केली. त्यानंतर संपूर्ण जगाने भारतावर निर्बंध लादले होते. जगातील अधिकांश देश आमच्या विरोधात उभे ठाकले होते. परंतु अटलजी आपल्या निर्णयावर ठाम होते. जगात शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख निर्माण झाली. त्यांच्या काळात देश रस्त्यांनी जोडला गेला, देशाचा विकास झाला. त्यांनी सर्वसामान्यांसाठी काम केले. राष्ट्रीय विचाराचे सरकार सत्तेत यावे, यासाठी त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विरोधात असताना सत्ताधाºयांवर अंकुश ठेवण्याचे काम केले. चांगल्या निर्णयाचे त्यांनी स्वागतही केले. वाजपेयी फक्त देशासाठीच जगले. त्यांच्या विचारातून व कार्यातून कार्यक र्त्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अटलजींमुळे आज भाजपाला ‘अच्छे दिन’आले
अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वयंसेवक म्हणून कामाला सुरुवात केली. श्यामाप्रसाद मुखर्जी व दीनदयाल उपाध्याय यांच्याकडून प्रेरणा घेत ते प्रतिकूल परिस्थितीत पक्षाचे काम करीत राहिले. राष्ट्रभक्ती व सर्वधर्मसमभाव या विचाराने ते कार्य करीत होते, म्हणूनच आज भाजपाला अच्छे दिन आले. अटलजींचे शक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी संकल्प केला तर भारत विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पक्ष कुणाच्या मर्जीवर चालत नाही. कार्यकर्त्यांच्या बळावर चालतो. अटलजी लोकशाहीवादी नेते होते. शालिनता व नम्रता त्यांच्याकडे होती. आणीबाणीच्या काळात दोन वर्षे ते कारागृहात होते. परंतु त्यांनी विरोधकांचा द्वेष केला नाही. लोकशाहीत मतभेद असू शकतात. विचाराची लढाई विचारानेच लढली पाहिजे, अशा मताचे वाजपेयी होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व अटलबिहारी वाजपेयी हे दोन नेते प्रभावी वक्त होते, असे सांगून गडकरी यांनी वाजपेयी यांच्या नागपूर भेटीदरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यासोबत नटसम्राट, मी फुलराणी अशी नाटके बघण्याची संधी मिळाली. तिकीट काढूनच नाटक बघायचे. नाट्य कलावंतांना दोन पैसे मिळावे, हा त्यामागील हेतू होता, असेही त्यांनी सांगितले.
भाजपा अटलबिहारी वाजपेयी यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. त्यांच्या विचारावर पक्ष चालला पाहिजे. पदासाठी संघर्ष करणे योग्य नसल्याचे आनंदराव ठवरे यांनी सांगितले. सुधाकर कोहळे यांनी प्रास्ताविकातून अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी तर आभार डॉ. राजीव पोतदार यांनी मानले.
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके , स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, सभापती संदीप जाधव, विधी समितीचे सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अस्थिकलशाचे दर्शन
सुरेश भट सभागृहाच्या प्रवेशद्वारावर अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर सभागृहात कलश ठेवण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊ न आदरांजली अर्पण केली.