नागपूरला बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया बनविण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 11:18 AM2020-08-07T11:18:55+5:302020-08-07T11:19:23+5:30
देशभरातील १०० स्मार्ट सिटीपैकी ९५ शहरांनी केंद्र शासनाच्या या उपक्रमात भाग घेतला असून यात, नागपूर शहराचाही समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरामध्ये सायकल चालविण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावयाचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड आणि नागपूर महापालिकेच्यावतीने गुरुवारी सकाळी इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील नागरिकांना सायकल चालविण्याकरिता प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून या माध्यमातून नागपूरला बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया बनविण्याचा निर्धार करण्यात आला.
केंद्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयातर्फे हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्ता पक्षनेता संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे आणि मोठ्या प्रमाणात सायकल चालक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी सायकलिंगचा आनंद घेतला.
प्रास्ताविकात महेश मोरोणे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. देशभरातील १०० स्मार्ट सिटीपैकी ९५ शहरांनी केंद्र शासनाच्या या उपक्रमात भाग घेतला असून यात, नागपूर शहराचाही समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरामध्ये सायकल चालविण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावयाचे आहे. ऑक्टोंबरपर्यंत सुरक्षित सायकल चालविण्याकरिता अंतर्भूत बायलेन तयार करणे, सर्वेक्षण करणे आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. ऑक्टोबर नंतर ११ शहरांचे दुसऱ्या फेरीसाठी केंद्र शासनामार्फत निवड केली जाईल आणि पारितोषिक म्हणून एक कोटी रुपयाचा पुरस्कार देण्यात येईल. सायकलचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी करण्यात मदत होते आणि नागरिकांचा शारीरिक व्यायाम देखील होते.
यावेळी पिंटू झलके,संदीप जाधव,तानाजी वनवे व जलज शर्मा यांनी सुध्दा नागरिकांना सायकलचा जास्तीत-जास्त वापर करुन नागपूरला बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया बनविण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात अॅमस्टरडॅमच्या बी.वाय.सी.एस. संस्थेच्या बायसिकल मेयर दीपांती पाल यांनी भाग घेतला. या कार्यक्रमात सहायक आयुक्त महेश धामेचा, प्रकाश वराडे, विजय हुमणे, साधना पाटील, सुषमा मांडगे, किरण बागडे, स्मार्ट सिटी कंपनी सेकेट्ररी भानुप्रिया ठाकूर, राजेश दुपारे, अर्चना अडसड, प्रणिता उमरेडकर, राहुल पांडे, सोनाली गेडाम, अनुप लाहोटी, पराग अर्मळ, कुणाल गजभिये, परिमल इनामदार, मुकेश मेहाडिया आदी उपस्थित होते.