गुणवाढ घोटाळ्यासंदर्भात आठवडाभरात निर्णय
By admin | Published: August 1, 2016 02:12 AM2016-08-01T02:12:09+5:302016-08-01T02:12:09+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात चार वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या गुणवाढ घोटाळा प्रकरणावर अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही.
कुलगुरुंचे सूतोवाच : चौकशी पूर्ण, अहवाल सादर
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात चार वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या गुणवाढ घोटाळा प्रकरणावर अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. यासंबंधातील चौकशी पूर्ण झाली असून याचा अहवाल कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना सादर करण्यात आलेला आहे. या घोटाळ्यासंदर्भात ३ आॅगस्ट अगोदर निर्णय घेणार असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे. तत्कालीन सहायक कुलसचिव संध्या चुनोडकर- हांडा या प्रकरणातील मुख्य आरोपी होत्या.
जुलै २०१२ मध्ये फेरमूल्यांकनातून गुणवाढ, असा घोटाळा उजेडात आला होता. विद्यापीठाच्या फेरमूल्यांकन विभागातील सहायक कुलसचिव संध्या चुनोडकर-हांडा यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या मुलाची तीन विषयात फेरमोजणी करून गुणवाढ करवून घेतली होती. हा प्रकार केवळ त्यांच्या मुलापुरता मर्यादित नव्हता तर इतरही अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला, असा आरोप होता. विद्यापीठाने शिस्तपालन समितीद्वारे चौकशी करण्याचा निर्णय घेतला व तेव्हापासून हे प्रकरण समितीकडे होते.परीक्षा मंडळाच्या बैठकीत या अहवालाला मान्यतादेखील देण्यात आली होती व चुनोडकर-हांडा यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती व सेवानिवृत्त न्यायाधीश धाराशिवकर यांच्यामार्फत विभागीय चौकशी करण्यात आली. या समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल तयार केला. तो अहवाल संध्या चुनोडकर यांना पाठवून त्यांना त्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यांची बाजू नोंदवून घेत, अंतिम अहवाल कुलगुरूंकडे पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात कुलगुरूंना विचारणा केली असता त्यांनी ही बाब मान्य केली. या प्रकरणासंदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने मला अधिकार दिले आहेत. परीक्षा मंडळाच्या बैठकीअगोदर हा निर्णय घेण्यात येईल व तो सर्वांसमोर येईल, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
काणेंनीच सुरू केली होती चौकशी
प्रभारी परीक्षा नियंत्रक असताना डॉ.काणे यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली होती. विभागीय चौकशी समितीसमोर त्यांची साक्षदेखील झाली व उलटतपासणीदेखील करण्यात आली. आता डॉ.काणे हे स्वत: कुलगुरू झाले आहेत व जी चौकशी त्यांनी सुरू केली होती, त्यावर कुलगुरू म्हणून निर्णय तेच देणार आहेत. या योगायोगासंदर्भात विद्यापीठातच चर्चा रंगली आहे.
अद्याप पोलीस तक्रार नाहीच
गुणवाढ घोटाळा हे गंभीर प्रकरण होते. यासंदर्भात शिस्तपालन समितीने कठोर कारवाईची शिफारस केली होती. या प्रकरणात पोलीस तक्रार करावी, अशी मागणी संघटनांनी केली होती. परंतु अद्यापपर्यंत पोलीस तक्रार झालेली नाही.