४०९ कलमावरील आक्षेपावर आज निर्णय
By admin | Published: January 5, 2016 03:28 AM2016-01-05T03:28:50+5:302016-01-05T03:28:50+5:30
श्रीसूर्या समूह गुंतवणूकदार फसवणूकप्रकरणी दाखल भारतीय दंड विधानाच्या कलम ४०९ विरुद्ध बचाव पक्षाने घेतलेल्या
नागपूर : श्रीसूर्या समूह गुंतवणूकदार फसवणूकप्रकरणी दाखल भारतीय दंड विधानाच्या कलम ४०९ विरुद्ध बचाव पक्षाने घेतलेल्या आक्षेपावर उद्या मंगळवारी एमपीआयडी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात निर्णय होणार आहे.
तसेच समीर जोशीसह सर्व अकराही आरोपींविरुद्ध आरोप निश्चित होणार आहेत. या प्रकरणी भादंविच्या ४०६, ४०९, ४२०, २०१, १२० ब, ३४, महाराष्ट्र गुंतवणूकदार (वित्तसंबंध) संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ३ आणि भारतीय रिझर्व्ह बँक कायद्याच्या ४५ एस, ५८ ब अन्वये गुन्हे दाखल आहेत. एकूणच दाखल कलमांपैकी ४०९ मध्येच जन्मठेपेच्या शिक्षेचे प्रावधान आहे. अन्य कलमांमध्ये केवळ सहा ते सात वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान आहे.
समीर जोशी याचे वकील अॅड. सुभाष घारे यांनी ४०९ या कलमाविरुद्ध आक्षेप घेऊन हे कलम काढण्याची मागणी केली. समीर जोशी हा सरकारी नोकर नाही आणि एजंटही नाही. त्याच्याकडे गुंतवणूकदारांनी विशिष्ट उद्देशासाठी आपापली मालमत्ता गुंतवली होती, म्हणून या प्रकरणात ४०९ हे कलम बसत नाही.
यावर विशेष सरकारी वकील अॅड. बी. एम. करडे यांनी असा युक्तिवाद केला की, श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी याच्याकडे गुंतवणूकदारांनी मोठ्या विश्वासाने आपापली मालमत्ता गुंतवली होती. तो या मालमत्तेचा विश्वस्त आहे, त्याने गुंतवणूकदारांचा विश्वासघात केला आहे. करडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी आणि न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी वासनकर प्रकरणी दिलेल्या निर्णयाचा आणि हर्षद मेहता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याचा आधार घेतला. न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकूण उद्यापर्यंत निर्णय राखून ठेवला.
न्यायालयात मंगळवारीच समीर जोशी, पल्लवी जोशी, श्रीकांत प्रभुणे, निशीकांत मायी, दिलीप डांगे, मोहन पितळे, मुकुंद पितळे, नितीन केसकर, शंतनू कुऱ्हेकर, आनंद जहागीरदार आणि मनोज तत्वादी, अशा ११ जणांविरुद्ध आरोप निश्चित होणार आहेत. आरोपींपैकी समीर जोशी आणि तत्वादी यांना अद्यापही जामीन झालेला नाही.
सोमलवाडा येथील रहिवासी हॉटेल व्यवसायी अमित गोविंद मोरे यांच्या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलिसांनी समीर जोशी, पल्लवी जोशी व इतरांविरुद्ध १४ सप्टेंबर २०१३ रोजी गुन्हे दाखल केले होते. आतापर्यंत १२४४ गुंतवणूकदार पुढे आले असून फसवणुकीची रक्कम १०० कोटींच्यावर गेलेली आहे. (प्रतिनिधी)
आणखी पाहिजे ७० आरोपी
श्रीसूर्या गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात शहर गुन्हे शाखेच्या अर्थिक गुन्हे पथकाला आणखी ७० आरोपी पाहिजे आहेत. त्यापैकी ३ आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी एमपीआयडी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. विनोद मायी, विनय दुबे आणि मधुश्री बल्लाळ, अशी आरोपींची नावे असून ते सर्व श्रीसूर्या समूहाचे एजंट होते. या आरोपींपैकी विनोद मायी याने ५५ लाख, बल्लाळने ९७ लाख आणि दुबे याने ३५ लाखांचे कमिशन लाटलेले आहेत. या तिघांच्या अर्जावर १५ जानेवारी रोजी निर्णय होणार आहे. येत्या दिवसात या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आरोपी अटक होण्याची चिन्हे दिसत आहेत.