वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आता ५ ऑक्टोबरला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:20 AM2020-10-03T00:20:29+5:302020-10-03T00:21:48+5:30
Mahavitran,employees, strike, Nagpur News एसएनडीएलमधून महावितरणमध्ये आलेल्या ३५० कर्मचाऱ्यांनी दुपारी ४ वाजता सामूहिक संपावर जाण्याचा इशारा दिल्याने वीज वितरण व्यवस्था डगमगली होती. परंतु रात्री ९ वाजता आंदोलन ५ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसएनडीएलमधून महावितरणमध्ये आलेल्या ३५० कर्मचाऱ्यांनी दुपारी ४ वाजता सामूहिक संपावर जाण्याचा इशारा दिल्याने वीज वितरण व्यवस्था डगमगली होती. परंतु रात्री ९ वाजता आंदोलन ५ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ४० कर्मचाऱ्यांना अचानक नोकरीतून काढण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी सामूहिक संपाचा निर्णय घेतला होता. हा संप जर कायम राहिला असता तर महावितरणला पुरवठा सुरळीत ठेवणे अवघड झाले असते.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एसएनडीएलची सेवा बरखास्त करून शहरातील ३ डिव्हिजन महाल, गांधीबाग व सिव्हिल लाईन्सचे कामकाज महावितरणने सांभाळले. एसएनडीएलचे ऑपरेटर, लाईनमन यांना आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कायम ठेवले. आता महावितरण त्यांच्या जागी परमनंट कर्मचाºयांना त्यांच्या जागी नियुक्त करीत आहे. जवळपास ४० ऑपरेटर व लाईनमनला काढण्यात आले आहे.
एसएनडीएलच्या या कर्मचाऱ्यांनी आज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या बॅनरखाली अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून दुपारी ४ वाजता सामूहिक संपावर जात असल्याची माहिती दिली. झोन सचिव नितीन शेंद्रे यांनी पत्रात स्पष्ट लिहिले की, शहरातील विजेचे संकट टाळण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा महावितरणमध्ये समावेश करण्यात यावा. महावितरणने एका वर्षातच या कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कर्मचाऱ्यांनी ऊर्जामंत्री व मुख्य अभियंता यांना पत्र लिहिले आहे. परंतु कु णीच दखल घेतली नाही. हे कर्मचारी अनेक वर्षापासून शहरातील सब स्टेशन बरोबरच वितरण प्रणालीची जबाबदारी सांभाळत आहे. मोठ्या संख्येने कर्मचारी संपावर गेल्यास वीज वितरण व्यवस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे.
अडचण होऊ देणार नाही - महावितरण
महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके म्हणाले की कंपनी नागरिकांना कुठलीही समस्या होऊ देणार नाही. फिल्डवर कंपनीचे २०० ऑपरेटर, लाईनमन तैनात आहेत. अन्य कर्मचाऱ्यांना जॉईन करायचे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची अडचण राहणार नाही.