अनलॉकसंदर्भात अंतिम नव्हे तर तत्वत: निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:49+5:302021-06-04T04:07:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्रातील १८ जिल्हे अनलॉक करण्याबाबत घोषणा झाल्यानंतर वादात सापडलेले मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील १८ जिल्हे अनलॉक करण्याबाबत घोषणा झाल्यानंतर वादात सापडलेले मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही तासांतच आपल्या वक्तव्याबाबत सारवासारव केली आहे. अनलॉकसंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. पाच टप्प्यांत निर्बंध शिथिल करण्याचा तत्वत: निर्णय झाला आहे. महाराष्ट्र उघडलेला नाही व अंतिम निर्णय मुख्यमंत्री काढणार, असे वडेट्टीवार यांनी नागपुरात स्पष्ट केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते बोलत होते.
माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचा दर पाच टक्क्यांहून कमी आहे तेथील निर्बंध शिथिल करण्यात येतील, असे मी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली आहे. हे काम टप्प्यांमध्ये होईल. दर सात दिवसांनी स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल. यावर निर्णयाचा अंतिम अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांना आहे, असे त्यांनी सांगितले. ज्या बैठकीत अनलॉकच्या प्रस्तावाबाबत चर्चा झाली त्यात मीदेखील सहभागी होतो. मी श्रेय घेण्यासाठी नव्हे तर मदत व पुनर्वसन विभागाचा मंत्री म्हणून प्रस्तावाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. कोरोना अद्याप संपलेला नाही; परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आला आहे तेथे निर्बंध शिथिल करणे आवश्यक आहे. अशा १८ जिल्ह्यांबाबत विचार करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.