वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:07 AM2021-06-06T04:07:20+5:302021-06-06T04:07:20+5:30
नागपूर : पदवी, पदव्युत्तर व प्रमाणपत्र वैद्यकीय अभ्यासक्रमांची २०२० मधील हिवाळी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...
नागपूर : पदवी, पदव्युत्तर व प्रमाणपत्र वैद्यकीय अभ्यासक्रमांची २०२० मधील हिवाळी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शनिवारी कायम ठेवला. त्यामुळे ही परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसारच होईल. परंतु, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी यासंदर्भात आदेश दिला. ऑफलाईन परीक्षेविरुद्ध हर्ड फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल देशमुख व फिजिओथेरपी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी नीतेश तानतरपले यांनी जनहित याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने १९ मे २०२१ रोजी या निर्णयाची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, १० ते ३० जूनपर्यंत ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील सुमारे ४५ हजार विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊन ही परीक्षा देणार आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. याचा विचार न करता वादग्रस्त निर्णय जारी करण्यात आला असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. त्यांनी ही परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता परीक्षा पद्धतीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. राहुल भांगडे यांनी कामकाज पाहिले.