पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय गुलदस्त्यात; ना घोषणा ना अधिसूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 11:19 AM2021-07-03T11:19:22+5:302021-07-03T11:19:45+5:30
Nagpur News बदलीची आस लावून असलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी एक दुसऱ्यांकडे फोनो फ्रेण्ड करून गुलदस्त्यातील निर्णयाची पार्श्वभूमी जाणून घेण्याचेही प्रयत्न चालविले आहेत.
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन दिवस होऊनही बदलीची अपेक्षीत यादी घोषित न झाल्यामुळे तसेच या संबंधाने निघणारी अधिसूचनादेखील जारी न झाल्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उत्सुकता टोकाला पोहचली आहे. त्यामुळे बदलीची आस लावून असलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी एक दुसऱ्यांकडे फोनो फ्रेण्ड करून गुलदस्त्यातील निर्णयाची पार्श्वभूमी जाणून घेण्याचेही प्रयत्न चालविले आहेत.
पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बढती-बदल्यांची प्रक्रिया साधारणता जूनच्या प्रारंभीपासून सुरू केली जाते. गेल्या वर्षी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या संबंधाने रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करून वादळ उठवले. या प्रकरणाने सरकारची मोठी कोंडी झाल्याने पोलिसांच्या बदलीचा विषय कमालीचा संवेदनशील बनला आहे. हा एक मुद्दा आणि दुसरा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत सरकारने जूनच्या पहिल्या आठवड्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० जून पूर्वी केल्या जाणार नाही, असे एका परिपत्रकातून स्पष्ट केले होेते. अर्थात राज्य पोलीस दलातील अधीक्षक आणि त्यावरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० जूननंतर कोणत्याही क्षणी केल्या जाईल, असा सरळसाधा अर्थ काढून बदलीसाठी इच्छुक असणारांनी ‘फिल्डिंग टाइट’ केली होती.
नागपूर, विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता. गेल्या आठवड्यात पोलीस महासंचालनालयातून एक वेगळी ऑर्डर काढण्यात आली. त्यात बदलीसाठी पात्र असलेल्या आणि ज्यांचे बदलीसाठी विनंती अर्ज मान्य झाले, अशा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक दर्जाच्या ३९ अधिकाऱ्यांची यादी जाहीर करून त्यांना बदलीच्या ठिकाणची ‘चॉइस’ मागितली होती. त्यामुळे बदलीसाठी पात्र असलेल्यांना चांगलाच हुरूप आला होता. १ जुलैला निश्चिंतपणे बदली होईल, असा अनेकांचा होरा होता. त्यामुळे त्यांनी तशी तयारीही करून ठेवली होती. १ जुलै गेल्यानंतर २ जुलैला नक्कीच होईल, असा अनेकांना विश्वास असताना आजही बदलीची यादी जाहीर झाली नाही. त्यामुळे सायंकाळनंतर उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या अधिकाऱ्यांपैकी अनेकांनी ठिकठिकाणी आपापल्या मित्रांना, सोर्सना फोनो फ्रेण्ड करून याबाबत विचारणा केली.
विशेष म्हणजे, कोणत्याच अधिकाऱ्यांकडून कुणालाच समाधानकारण माहिती मिळाली नाही. त्यामुळे वेगळीच अस्वस्थता या अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर टाकण्याचा सरकारने निर्णय घेतल्यास तशी सूचना गृहमंत्रायल, पोलीस महासंचालनालयाकडून काढली जाते. मात्र, शुक्रवारी २ जुलैला रात्रीचे ९ वाजले तरी असे कोणतेही पत्रक जारी न झाल्यामुळे बदलीची आस लावून बसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची धडधड तीव्र झाली आहे.