अनलॉकचा निर्णय व्यापाऱ्यांच्या हिताचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:54+5:302021-06-06T04:06:54+5:30
नागपूर : कोरोना संसर्ग आणि रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच सोमवार, ७ जूनपासून नागपूर जिल्हा अनलॉक करण्याचा राज्य शासनाने ...
नागपूर : कोरोना संसर्ग आणि रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच सोमवार, ७ जूनपासून नागपूर जिल्हा अनलॉक करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे. त्यामुळे व्यवसायाला गती येईल आणि आर्थिक नुकसान भरून निघेल, असा विश्वास विविध व्यापारी संघटनांनी व्यक्त केला. राज्य शासनाचे नियम आणि अटींचे पालन करून व्यापारी व्यवसाय करतीलच, पण त्यासोबतच ग्राहकांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, कोरोना काळात किराणा दुकाने सकाळी ११ पर्यंत आणि नंतर दुपारी २ पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्बंध होते. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला होता. पण आता अनलॉकच्या निर्णयामुळे व्यवसायाला गती येऊन ग्राहकांना वेळेनुसार खरेदी करणे शक्य होणार आहे. व्यवसाय सुरळीत होण्यास काही दिवस लागतील.
चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ इंडस्ट्री व ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनासोबतच कोरोनाचा संसर्ग वाढू न देण्याची व्यापारी व ग्राहकांची जबाबदारी आहे. गेल्या वर्षी आणि यंदा दुकाने दोन महिने बंद असल्याने व्यापारी मानसिक आजाराने त्रस्त आहेत. आता दुकाने पूर्णवेळ सुरू होणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे. व्यापाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
सोना-चांदी ओळ कमिटीचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, गेल्या वर्षी आणि यंदा सणांचे हंगाम बुडाल्याने सराफा व्यापारी संकटात आले आहेत. ग्राहक दागिन्यांची खरेदी प्रत्यक्ष पाहूनच करतो. दुकाने बंद असल्याने ग्राहकांनी खरेदी केली नाही. त्यामुळे सराफांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय बुडाला. पूर्वीच्या तुलनेत सध्या लग्नाची खरेदी करायला कमी लोक येतात. कोरोना नियम आणि अटींचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्यात्या सूचना सराफांना केल्या आहेत.
सीताबर्डी मर्चंट असोसिएशनचे हुसेन अजानी म्हणाले, दुकाने पूर्ण वेळ सुरू झाल्यानंतर शासनाचे नियम आणि अटींचे पालन करून व्यवसाय करण्यात येणार आहे. दुकानदारांनी तयारी केली आहे. जुना माल विक्रीला काढून सणांमध्ये नवीन मालाची खरेदी करण्यात येणार आहे.
इतवारी ठोक किराणा असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवप्रताप सिंह म्हणाले, दुकाने पूर्ण वेळ सुरू राहणार असल्याने बाजारात गर्दी होणार नाही. शिवाय खरेदीही सुलभ होईल. सर्वच दुकानदारांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहे. ग्राहकांनीही विनाकारण गर्दी करू नये.