रेल्वे कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन स्टाफ घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:35+5:302021-06-09T04:08:35+5:30
नागपूर : रेल्वे मंत्रालयाने केवळ आरपीएफ आणि रेल्वे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन स्टाफ घोषित केले आहे. त्यामुळे नागपूर विभागातील उर्वरित ...
नागपूर : रेल्वे मंत्रालयाने केवळ आरपीएफ आणि रेल्वे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन स्टाफ घोषित केले आहे. त्यामुळे नागपूर विभागातील उर्वरित हजारो रेल्वे कर्मचाऱ्यांनी ट्विट करून पंतप्रधान, रेल्वेमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना आम्हालाही फ्रंटलाइन स्टाफ घोषित करा, अशी मागणी केली आहे.
ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनच्या आवाहनानुसार नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांच्या नेतृत्वात मध्य रेल्वे आणि भारतीय रेल्वेतील लाखो कर्मचाऱ्यांनी आज रेल्वे कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन स्टाफ घोषित करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान, रेल्वेमंत्री, आरोग्यमंत्री यांना ट्विट केले. वेणू नायर यांनी म्हटले की, देशात पहिले लॉकडाऊन लागल्यापासून रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची सेवा केली. देशात सर्वत्र औषधी, खाद्यपदार्थ, पेट्रोल, डिझेल, कोळसा आणि श्रमिकांना त्यांच्या राज्यात पोहोचविले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये ऑक्सिजन पोहोचविण्याचे काम केले. तरीसुद्धा केंद्र शासन रेल्वे कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन स्टाफ घोषित करण्यासाठी मनाई करीत आहे. कोरोनामुळे हजारो रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना त्वरित फ्रंटलाइन स्टाफ घोषित करण्याची मागणी त्यांनी केली. नागपूर मुख्यालयात कार्यकारी अध्यक्ष हबीब खान, विभागीय सचिव सुनील झा, संघटक ई. व्ही. राव यांनी अभियानाचे नेतृत्व करून हजारो कर्मचाऱ्यांना ट्विट करण्यासाठी मदत केली.
...............