दुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा : अनिल देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 09:00 PM2018-10-24T21:00:02+5:302018-10-24T21:00:56+5:30
भाजपा सरकारने राज्यातील १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले. सरकारने जाहीर केलेली दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा ही शेतकऱ्यांची फसवेगिरी असून, सरकारने दुष्काळसदृश नाही तर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपा सरकारने राज्यातील १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले. सरकारने जाहीर केलेली दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा ही शेतकऱ्यांची फसवेगिरी असून, सरकारने दुष्काळसदृश नाही तर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली.
आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने उभी पिके करपून गेली आहेत. राज्यात पाण्याची तीव्र समस्या निर्माण झालेली आहे. अशातच सरकारने केलेली दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा फसवी आहे. महाराष्ट्रात येऊन पाहणी करून गेलेल्या केंद्रीय पथकाने अहवाल दिल्यानंतरच दुष्काळ जाहीर करण्याची घोषणाही संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
सरकार जोपर्यंत दुष्काळ जाहीर करीत नाही तोपर्यंत खरीपातील सोयाबीन व कापसाला मदत मिळू शकत नाही. तसेच संपूर्ण राज्यात विहिरीत पाणी कमी असल्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून, या पिकांनाही मदत होऊ शकणार नाही. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित सवलती द्याव्यात व आर्थिक मदत करावी; अन्यथा राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देशमुख यांनी दिला.