जागतिक बाजारात रासायनिक खताच्या दरात घसरण; भारतात मात्र जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2023 08:00 AM2023-04-26T08:00:00+5:302023-04-26T08:00:02+5:30

Nagpur News देशात रासायनिक खतांच्या किमती सन २०२१-२२ च्याच कायम असून, खतांचे दर प्रतिबॅग किमान १५० ते ३५० रुपयांनी कमी हाेणे अपेक्षित आहे.

Decline in the price of chemical fertilizer in the global market; But in India it was like that | जागतिक बाजारात रासायनिक खताच्या दरात घसरण; भारतात मात्र जैसे थे

जागतिक बाजारात रासायनिक खताच्या दरात घसरण; भारतात मात्र जैसे थे

googlenewsNext

सुनील चरपे

नागपूर : पाच महिन्यांपासून जागतिक पातळीवर रासायनिक खतांच्या दरात घसरण सुरू आहे. फेब्रुवारीमध्ये डीएपीचे दर ६८,८१२ रुपये प्रतिटन हाेते ते आता ४५,३०१ रुपये प्रतिटनावर आले आहेत. युरियाचे दर २६,६२४ रुपये प्रतिटनावरून २५,८०४ रुपये प्रतिटन झाले आहेत. देशात रासायनिक खतांच्या किमती सन २०२१-२२ च्याच कायम असून, खतांचे दर प्रतिबॅग किमान १५० ते ३५० रुपयांनी कमी हाेणे अपेक्षित आहे.

एमओपीचे दर प्रतिटन ४८,३३२ रुपयांवरून ३४,५७० रुपयांवर आले आहेत. भारतात दरवर्षी किमान १०० लाख टन डीएपीचा वापर केला जात असून, ६० लाख टन डीएपी आयात केले जाते. युरियाचा वापर किमान १०० लाख टन आहे. एमओपीचा वापर २६ लाख टन असून, २५ लाख टन एमओपी आयात केले जाते. एनपीके मिश्र खतांचा वापर ११५ लाख टन असता तरी १२ ते १४ लाख टन मिश्र खते आयात केली जातात.

युरियाच्या उत्पादनात अमाेनिया वायूचा वापर केला जाताे. पूर्वी अमाेनियाचे दर ९८,३०४ रुपये प्रतिटन हाेते. तेही आता घसरले आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अमाेनिया वायूचे दर ३०,७२० रुपये प्रतिटन झाले आहेत. डीएपीच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या फाॅस्फरिक ॲसिडचे दर प्रतिटन १,२०८१७ रुपयांवरून ८६,०१६ रुपयांवर आले आहेत. परिणामी, जागतिक बाजारात रासायनिक खते आणि ती तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे दर कमी हाेत असल्याने भारतात सर्वच रासायनिक खतांचे दर कमी व्हायला हवे, असे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

रासायनिक खतांचे सध्याचे दर (रुपये-प्रतिबॅग)

डीएपी - १,३५०

एसएसपी - ५५०

युरिया - २६६

१०:२६:२६ - १,४७०

२०:२०:००:१३ - १,२५०

१५:१५:१५ - १,४७०

 

रासायनिक खतांवरील सबसिडी (रुपये-प्रतिटन)

डीएपी - ४८,०००

एमओपी - १८,०००

एसएसपी - ८,०००

युरिया - ५४,०००

चार महिन्यांपासून पाेटॅशचा तुटवडा

देशात चार महिन्यांपासून एमओपी (म्युरेट ऑफ पाेटॅश)ची आयात करण्यात आलेली नाही. त्यामुळे तीन महिन्यांपासून पाेटॅश मिळेनासे झाले आहे, अशी माहिती केळी उत्पादकांनी दिली असून, याला ‘माफदा’च्या पदाधिकाऱ्यांनी दुजाेरा दिला आहे. पाेटॅशच्या कमतरतेमुळे केळीसह इतर पिकांचा दर्जा खालावताे. मात्र, यावर कुणीही बाेलायला तयार नाही.

 

आधी अतिमुसळधार पाऊस तर आता अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सध्या रासायनिक खतांच्या कच्च्या मालाचे दर कमी हाेत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने खतांचे दर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. साेबतच खतांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

- विनाेद तराळ, अध्यक्ष,

महाराष्ट्र फर्टिलायझर, पेस्टिसाईट्स, सीड्स डिलर्स असाेसिएशन (माफदा).

Web Title: Decline in the price of chemical fertilizer in the global market; But in India it was like that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती