जिल्ह्यातील काेराेना रुग्णसंख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:09 AM2021-05-10T04:09:37+5:302021-05-10T04:09:37+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : नागपूर जिल्ह्यातील काेराेना रुग्णसंख्येत हळूहळू घट हाेत आहे. मात्र, नागरिकांनी नियमांचे काटेकाेर पालन करणे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : नागपूर जिल्ह्यातील काेराेना रुग्णसंख्येत हळूहळू घट हाेत आहे. मात्र, नागरिकांनी नियमांचे काटेकाेर पालन करणे व भीती न बाळगता काेराेना प्रतिबंधक लसीकरण करवून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जलालखेडा (ता. नरखेड) येथील ग्रामपंचायत कार्यालयातील आढावा बैठकीत केले. यावेळी त्यांनी जलालखेडा येथील आठवडी व गुजरीबाजार याबाबतही विचारणा केली. शिवाय, स्थानिक काेराेना रुग्णसंख्या, संक्रमण राेखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययाेजना, लसीकरण याही बाबींचा आढावा घेतला.
विशेष म्हणजे, लाेकमतमध्ये ‘गुजरीच्या नावाखाली भरताे बाजार’ या शीर्षकाखाली शनिवारी (दि. ८) वृत्त प्रकाशित करण्यात आले हाेते. या वृत्ताची दखल घेत तातडीने ही आढावा बैठक घेण्यात आली. यात जलालखेडा येथे ६३ काेराेना संक्रमित रुग्ण असून, यातील ९० टक्के रुग्णांना काेराेनाची काेणतीही लक्षणे नाहीत, तर १० टक्के रुग्णांना साैम्य लक्षणे आहेत. त्यांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती जलालखेडा प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रशांत वैखंडे यांनी दिली.
कोरोना संक्रमण राेखण्यासाठी सर्वानी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध आहेत. २० मेनंतर ग्रामीण भागात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले जाईल. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने त्या लाटेचा सामना करण्यासाठी शासन व प्रशासन तयारीला लागले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काेराेना रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून येताच त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी ठाणेदार हरिश्चंद्र गावडे यांना दिले.
उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी आठवडीबाजाराबाबत विचारणा केली. त्यावर जलालखेडा येथे शुक्रवारी आठवडीबाजार भरत असून, ताे पूर्णपणे बंद आहे. दाेन आठवड्यांपासून गुजरी बाजार भरायला सुरुवात झाली. या बाजाराचे स्वरूप वाढत गेले. पाेलिसांच्या मदतीने विक्रेत्यांना उठवून बाजार विरळ करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती अतुल पेठे यांनी दिली. यानंतर गुजरी बाजार भरणार नाही. विक्रेते गाडीच्या मदतीने भाजीपाल्याची विक्री करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीला उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार डी.जी. जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, खंडविकास अधिकारी प्रशांत मोहोड, सरपंच कैलास निकोसे, उपसरपंच मयूर सोनोने, अतुल पेठे, ग्राम विकास अधिकारी सुनील इचे यांच्यासह नागरिक व कर्मचारी उपस्थित हाेते.
...
सहा मिनिट वाॅक टेस्ट
रुग्णांची ऑक्सिजन पातळी माेजून त्याचे रेकाॅर्ड ठेवले जाते. त्याचप्रमाणे रुग्णांची सहा मिनिट टेस्ट घेणे व त्याच रेकाॅर्ड ठेवणे आवश्यक आहे. हीच टेस्ट सामान्य व्यक्तींची घेणे गरजेचे आहे, अशी सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आशासेविकांशी चर्चा करताना केली. बहुतांश नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुुळे थोडी जरी लक्षणे आढळून आल्यास त्यांची चाचणी करून घ्यावी. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या वॉर्डातील नागरिकांशी संपर्कात राहून चाचणी, लसीकरण व वॉक टेस्टबाबत माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.