कळमन्यात चाकूच्या धाकावर दरोडा : सहापैकी पाच आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:32 PM2019-07-12T23:32:23+5:302019-07-12T23:33:48+5:30
चाकूच्या धाकावर दरोडा घालून एका व्यक्तीला गंभीर जखमी करणाऱ्या पाच दरोडेखोरांना कळमना पोलिसांनी ताब्यात घेतले. या पाचमध्ये दोन अल्पवयीन आहेत. या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी फरार आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चाकूच्या धाकावर दरोडा घालून एका व्यक्तीला गंभीर जखमी करणाऱ्या पाच दरोडेखोरांना कळमना पोलिसांनी ताब्यात घेतले. या पाचमध्ये दोन अल्पवयीन आहेत. या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी फरार आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली.
जुना कामठी मार्गावर झाडे ले-आऊट आहे. विरळ वस्तीच्या या भागात अशोक पटले, लता रंगलाल पटले आणि शेख सलीम शेख चांदमिया हे आजूबाजूला राहतात. ५ जुलैला रात्री तीन ते चार आरोपी पटलेच्या घरासमोर आले. त्यांनी तेथून पटलेच्या पाळीव श्वानाचे पिल्लू उचलले. ते चोरून नेत असल्याचे लक्षात आल्याने पटले यांनी आरोपींना हटकले. त्यावरून आरोपींनी पटलेंसोबत वाद घालून त्यांना बेदम मारहाण केली आणि पळून गेले. पटले यांनी या घटनेची तक्रार कळमना ठाण्यात नोंदवली असता पोलिसांनी त्याची अदखलपात्र अशी नोंद करून पटलेंना एनसीची पावती दिली.
९ जुलैला रात्री ९ च्या सुमारास सहा आरोपी पुन्हा याच भागात आले. यावेळी लता नागपुरे आणि शेख सलीम यांना आरोपींनी पटलेचे घर कोणते आहे, अशी विचारणा केली. या दोघांनी माहीत नाही म्हटल्यामुळे ते संतप्त झाले. त्यावेळी ते तेथून निघून गेले. त्यांनी पटलेचे घर शोधले. आरोपींनी त्यांच्या घरातून टीव्ही, कुलर चोरला आणि अन्य साहित्याची तोडफोड केली. नंतर ते लता नागपूरेंच्या घरी शिरले. त्यांनी घरात असलेल्या लता तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना चाकूचा धाक दाखवून लता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि त्यांच्या पतीचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपी सलीम शेख यांच्या घरात शिरले. त्यांनाही चाकूच्या धाकावर रोख आणि मौल्यवान चिजवस्तूंची मागणी केली. सलीम यांनी विरोध केला असता आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर चाकूने हातावर मारून त्यांच्याकडून ६ हजार रुपये तसेच मोबाईल हिसकावून घेतले. आरोपी पळून गेल्यानंतर लता नागपूरे आणि सलीम यांनी कळमना ठाण्यात धाव घेतली. लुटमारीचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.
खबऱ्याने दिली टीप
ज्या भागात हा गुन्हा घडला. त्या भागात रेल्वेलाईन आहे. तेथून एका खबºयाने आरोपींविषयी माहिती कळविली. त्यावरून पोलिसांनी कळमना गावातून गौरव उर्फ दद्दू अनिल उईके (वय १८, रा. समतानगर, नारी), रासकिन आणि सागर या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी खापरखेडा परिसरातील एका बारमधून ललित ऊर्फ पीयूष सुरेश मुळे (वय १८, रा. राजलक्ष्मीनगर, कळमना)आणि आसिफ या दोघांना ताब्यात घेतले. त्यांचा मिखल नामक एक साथीदार फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कळमन्याचे ठाणेदार विश्वनाथ चव्हाण, उपनिरीक्षक अमितकुमार आत्राम, पी. डी. बांबोळे, हवालदार छगन राऊत, राजेश तिवारी, नायक राजेश नाईक, मनोज बहुरूपी यांनी ही कारवाई केल्याचे पोलीस उपायुक्त पोद्दार यांनी सांगितले.
एमपीडीए किंवा मोक्काची कारवाई
या गुन्ह्यातील आरोपींचा पोलिसांनी क्राईम रेकॉर्ड काढला असता ते सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी गौरवसह बहुतांश गुन्हेगारांना दारूचे व्यसन आहे. ते भागविण्यासाठीच हे गुन्हेगारी करीत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला. आरोपी गौरव ऊर्फ दद्दूवर ५, पियूषवर ३ आणि आसिफवरही एक गुन्हा असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यावर एमपीडीए किंवा मोक्कासारखी कारवाई करता येईल का, त्याचा विचार करीत असल्याचेही उपायुक्त पोद्दार यांनी सांगितले.