लाचखोरांवरील कारवाईत घट : वर्षभरात लाचप्रकरणांत ११० सापळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 08:45 PM2018-03-01T20:45:17+5:302018-03-01T20:45:29+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयातर्फे २०१७ या एका वर्षात एकूण ११० लाच प्रकरणांत यशस्वी सापळे रचण्यात आले. मागील तीन वर्षांपासून या आकड्यात सातत्याने घट होत आहे. २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये यशस्वी सापळ्यामध्ये १८ टक्क्यांनी घट झाली आहे. एकीकडे भ्रष्टाचार घटला नसल्याची ओरड सामान्य नागरिकांकडून होत असताना, ही आकडेवारी पाहता खरोखरच भ्रष्टाचार कमी झाला की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईचा उत्साहच जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयातर्फे २०१७ या एका वर्षात एकूण ११० लाच प्रकरणांत यशस्वी सापळे रचण्यात आले. मागील तीन वर्षांपासून या आकड्यात सातत्याने घट होत आहे. २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये यशस्वी सापळ्यामध्ये १८ टक्क्यांनी घट झाली आहे. एकीकडे भ्रष्टाचार घटला नसल्याची ओरड सामान्य नागरिकांकडून होत असताना, ही आकडेवारी पाहता खरोखरच भ्रष्टाचार कमी झाला की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईचा उत्साहच जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१७ या वर्षभरातील लाच प्रकरणे, त्यात अडकलेले अधिकारी-कर्मचारी, झालेली कारवाई इत्यादीसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. लाचलुचपत खात्याच्या पोलीस उपअधीक्षकांकडून प्राप्त अधिकृत आकडेवारीनुसार २०१७ मध्ये वर्षात ११० सापळा प्रकरणांमध्ये १४२ आरोपी अडकले.
एकूण सापळ्यात अडकलेल्यांमध्ये पोलीस विभागातील ३२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २०१६ मध्येदेखील पोलीस खात्याचा लाचखोरांमध्ये पहिला क्रमांक होता. महसूल खात्यात १४सापळ्यामध्ये १९ जण लाच घेताना अडकले. वन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात १० सापळे यशस्वी ठरले व यात १२ जण अडकले.
‘क्लास वन’चे १३ अधिकारी सापळ्यात
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत एकूण १३ ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाली. यात पोलीस विभागातील ४, महसूल विभाग व जिल्हा परिषदेतील प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दुसऱ्या श्रेणीतील १३ अधिकाऱ्यांना लाच प्रकरणात पकडण्यात आले. सर्वात कमी म्हणजे ७ कर्मचारी हे चतुर्थ श्रेणीतील निघाले.
६ वर्षांत ६९६ प्रकरणे
२०१२ पासून नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे लाचखोरीची ६९६ प्रकरणे समोर आणण्यात आली. २०१२ ते २०१५ मध्ये हे प्रकरणांचे प्रमाण सातत्याने वाढत होते. मात्र त्यानंतर एकूण सापळ्याचे प्रमाण घटलेले आहे.
विभागनिहाय कारवाई
पोलीस ३२
महसूल १९
वन १२
जिल्हा परिषद ११
पंचायत समिती ११
ग्रामपंचायत ९
आरोग्य ८
वर्षनिहाय प्रकरणे
२०१२ ५१
२०१३ ७२
२०१४ १५५
२०१५ १७३
२०१६ १३५
२०१७ ११०
श्रेणीनिहाय लाचखोर @ २०१७
वर्ग १ १३
वर्ग २ १३
वर्ग ३ ८८
वर्ग ४ २
इलोसे ९
खासगी १७