राज्यात डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:37 AM2020-01-09T00:37:50+5:302020-01-09T00:38:44+5:30
२०१९ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी २०१८ सालच्या तुलनेत मृत्यूंमध्ये मात्र बरीच घट झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डासांमार्फत पसरणाऱ्या विविध रोगांवर नियंत्रण यावे यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग, चिकनगुन्या यासारख्या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात या कार्यक्रमांतर्गत २०१९ साली थोडेफार यश मिळाल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी २०१८ सालच्या तुलनेत मृत्यूंमध्ये मात्र बरीच घट झाली आहे. २०१६ सालापासून ३६ महिन्यात १७५ हून अधिक रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. २०१९ साली १० महिन्यात ही संख्या १२ इतकी होती. माहितीच्या अधिकारांतर्गत ही बाब समोर आली आहे.
राज्यात डासांमुळे प्रसारित होणाºया रोगांसंदर्भात उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी आरोग्यविभाग सहसंचालकांकडे (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. २०१६ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत राज्यात डेंग्यू-हिवताप-हत्तीरोग-चिकनगुन्याचे किती रुग्ण आढळले, किती रुग्णांचा मृत्यू झाला इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत या कालावधीत राज्यात डेंग्यूचे ३५ हजार ५५८ रुग्ण आढळून आले व त्यात १८० रुग्णांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये ११ हजार ३८ रुग्ण आढळून आले होते व ७० रुग्णांना जीव गमवावा लागला तर २०१९ च्या पहिल्या दहा महिन्यात हीच संख्या ९ हजार ८९९ रुग्ण व १२ मृत्यू इतकी होती.
हिवतापावर बऱ्यापैकी नियंत्रण
केंद्र, राज्य शासनाकडून हिवतापावर नियंत्रण यावे यासाठी विविध मोहीम राबविण्यात आल्या. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवतापाच्या रुग्णांचे प्रमाण २०१६, २०१७, २०१८ च्या तुलनेत कमी झाले आहे. २०१६ मध्ये २३,९८३ रुग्ण व २६ मृत्यू, २०१७ मध्ये १७,७१० रुग्ण व २० मृत्यू तर ७,१७८ रुग्ण व पाच मृत्यू अशी होती. २०१६ च्या तुलनेत रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली आहे.