हरभऱ्याच्या उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:09 AM2021-03-01T04:09:58+5:302021-03-01T04:09:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : मररोगाने हिरव्याकंच बहरलेल्या पिकांची नासाडी केली. त्यानंतर हवामान बदलाचाही फटका हरभरा पिकाला बसला. आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : मररोगाने हिरव्याकंच बहरलेल्या पिकांची नासाडी केली. त्यानंतर हवामान बदलाचाही फटका हरभरा पिकाला बसला. आता सर्वच शिवारात युद्धस्तरावर हरभरा कापणीचे आणि काढणीचे काम सुरू आहे. यंदा हरभरा चांगला होणार असे दिवास्वप्न रंगविणाऱ्या शेतकऱ्यांना हरभरा काढणीनंतर चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे. कुणाला एकरी ३-४ तर कुणाला ५-६ क्विंटल एवढ्यावरच समाधान मानावे लागत असून, यंदाच्या मोसमात हरभऱ्याच्या उत्पादनात घट आल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्याचे चित्र आहे.
खरीप हंगामात सोयाबीनच्या अल्प उत्पादनामुळे अनेकांना घाम फोडला. निदान रबीमध्ये हरभरा होणार या आशेवर शेतकरी होते. बीजप्रक्रिया, महागड्या औषधांची फवारणी, मजुरी, कापणी, काढणी यामध्येच शेतकऱ्यांचा बोजवारा उडाला. एकूण उत्पादन खर्च अधिक आणि उत्पादन कमी असे संपूर्ण हरभऱ्याचे गणित शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारे ठरले आहे.
हरभरा शेतातून घराकडे पोहोचत असला तरी दुसरीकडे शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याचे अद्याप संकेत नाहीत. खरेदीचे परिपत्रकच आले नाही. यामुळे खरेदी केंद्र कधी सुरू होणार, असा सवाल शेतकऱ्यांचा आहे.
....
ऑनलाईन अर्ज
उमरेड विकास खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीला उमरेड तालुक्याचा हरभरा खरेदीची एजन्सी म्हणून काम सोपविण्यात आले आहे. सध्या ४२६ शेतकऱ्यांनी शासकीय चणा खरेदीसाठी नोंदणी केली आहे. मागील वर्षी १६ हजार क्विंटल चणा खरेदी केला होता. यावर्षी १८ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना नोंदणी करावयाची आहे, त्यांनी सातबारा, आठ-अ तसेच बँक आणि आधारकार्डची झेरॉक्स आदी दस्तऐवज सोबत आणावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष गजानन झाडे यांनी केले आहे.
....
तालुकानिहाय खरेदी
यावर्षी प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र खरेदी केंद्र सोपविण्यात आले असून, ज्या तालुक्यात शेती त्याच तालुक्यातील केंद्रावर चणा खरेदी अशी अट ठेवण्यात आली आहे. यामुळे यंदा तालुकानिहाय खरेदी होणार आहे.