'आपली' बसच्या तिकीट उत्पन्नात घट : खर्चात मात्र दिडपट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 09:44 PM2019-11-11T21:44:06+5:302019-11-11T21:46:21+5:30
महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जातो. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. ‘आपली बस’च्या उत्पन्नात गेल्या तीन महिन्यापासूत सतत घट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जातो. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. ‘आपली बस’च्या उत्पन्नात गेल्या तीन महिन्यापासूत सतत घट होत आहे. याला आळा घालण्यासाठी उपाययोजना राबविल्या नाही. दुसरीकडे विभागाचा दर महिन्याच्या खर्चात लाखो रुपयांनी वाढ होत असल्याने यामुळे विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आपली बसला तिकीट उत्पन्नातून जुलै २०१९ मध्ये ६ कोटी ८६ लाख ३६ हजार १७६ रुपये उत्पन्न झाले. तर या महिन्यात विभागाचा खर्च १० कोटी २५ हजार ७२ रुपये झाला. ऑगस्ट महिन्यात ६ कोटी ३९ लाख ६९ हजार ९४३ रुपये उत्पन्न तर खर्च ११ कोटी ९५ लाख ९९ हजार ८८६ रुपये झाला. सप्टेंबर महिन्यात ६ कोटी १४ लाख ८७ हजार ६६ रुपये उत्पन्न तर खर्च १५ कोटी ८ लाख ५६ हजार ९४६ इतका झाला. म्हणजेच तीन महिन्यात तिकीटापासून मिळणाऱ्या उत्पन्नात तब्बल २४ लाख ८२ हजार ८७७ रुपयांनी घट झालेली आहे. दुसरीकडे जुलै ते सप्टेंबर या तीन मन्यिात खर्च ५ कोटी ८ लाख ३१ हजार ८७४ रुपयांनी वाढला आहे. बसच्या तिकीट उत्पन्नात वाढ होत नसताना खर्च मात्र दिड पटीने वाढला आहे. यामुळे परिवहन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बसच्या तोट्यात दर महिन्याला होणारी वाढ कायम राहिल्यास भविष्यात परिवहन विभागापुढे गंभीर संकट उभे ठाकणार आहे. गुरुवारी होणाऱ्या परिवहन समितीच्या बैठकीत यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
मागील काही महिन्यापासून तिकीट तपासण्याची मोहीम थंडावली आहे. याचा परिणाम तिकीटापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर झाला आहे. जुन्या ऑपरेटरला महापालिकेच्या तिजोरीतून पैसे दिले जात नव्हते. परंतु शहरातील प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा मिळावी. यासाठी तीन नवीन बस ऑपरेटची नियुक्ती करून दर महिन्याला महापालिकेच्या तिजोरीतून निधी खर्च करण्याची तयारी केली. यासाठी महापालिकेच्या वर्ष २०१९-२० च्या अर्थसंकल्पात परिवहन विभागासाठी १०८ कोटींची तरतूद केली आहे. सेवेत फारशी सुधारणा झालेली नाही. मात्र परिवहन विभागाचा खर्च वाढला आहे.
मे.साईनला करणार ९.४९ लाख माफ
शहरातील १५८ बस थांब्यापैकी ६० बस थांबे शहरातील विकास कामामुळे उपयोगात नसल्याचा दावा करीत कंत्राटदार मे.साईन पोस्ट कंपनीला ९ लाख ४९ लाखांची रॉयल्टी माफ करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी देण्याची तयारी परिवहन समितीने केली आहे. यावर गुरुवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.