नागपूरच्या मेडिकलमध्ये ‘डेडिकेटेड ओबेसिटी’ कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:28 AM2018-02-21T00:28:40+5:302018-02-21T00:30:45+5:30
लठ्ठपणा हा एक आजार आहे आणि त्यावरील योग्य उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘डेडिकेटेड ओबेसिटी’ कक्ष सुरू केला आहे. मध्य भारतातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात समृद्धी वाढत असतानाच लठ्ठ लोकांचे प्रमाणही वाढत असून, ते हाताबाहेर चाललेले आहे. लठ्ठ होण्यामागे काही विशिष्ट कारणे असतात. त्यामध्ये शरीराला हालचाली नसणे, बैठीकामे, अधिक उष्मांकाचा आहार यांचा समावेश होतोच, पण अनुवांशिकता आणि शरीराच्या चयापचय क्रि यांतील असमतोल हेही कारणे असतात. लठ्ठपणा हा एक आजार आहे आणि त्यावरील योग्य उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘डेडिकेटेड ओबेसिटी’ कक्ष सुरू केला आहे. मध्य भारतातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.
विशेष म्हणजे, लठ्ठपणामुक्त महाराष्ट्र हा उद्देश ठेवून प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘डेडिकेटेड ओबेसिटी’कक्ष सुरू करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. त्याची सुरुवात नागपूर मेडिकलमधून झाली.
लठ्ठपणा म्हणजे शारीरिक बेढबपणा नाही, तर तो एक रोग असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केले आहे. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या लठ्ठपणाच्या समस्येवरचा उपाय म्हणून बेरियाट्रिक शस्त्रक्रिया प्रसिद्ध आहे. नागपूरच्या मेडिकलमध्ये शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांच्या नेतृत्वात ही शस्त्रक्रिया सुरू असून आतापर्यंत मेयो, मेडिकलमध्ये ३०० वर शस्त्रक्रिया झाल्या. आता यात ‘डेडिकेटेड ओबेसिटी’ कक्षाची भर पडल्याने शस्त्रक्रियेपूर्वीच्या उपचाराला योग्य दिशा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पाचपैकी एक पुरुष किंवा स्त्री ‘ओव्हरवेट’
भारतात जंक फूड, अल्कोहोल व अयोग्य जीवनशैलीमुळे पाचपैकी एक पुरुष किंवा स्त्री ‘ओव्हरवेट’ किंवा ‘ओबेसिटी’ग्रस्त आहे. भारत हा ‘ओबेसिटी’ या लठ्ठपणाशी संबंधित आजारात जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. ‘ओबेसिटी’ हा एक आजार आहे, हे लोकांना माहितच नाही. वजन जास्त असल्यामुळे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, आर्थरायटिस, कर्करोग, अॅथरोस्केरासिस असे आजार होऊ शकतात.
मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात ‘डेडिकेटेड ओबीसीटी’ हे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले असून यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कक्षात येणाऱ्या लठ्ठ रुग्णांची नोंदणी केली जाईल. लठ्ठपणासह मधुमेह, उच्चरक्तदाब व इतरही आजारांची माहिती घेऊन तीन महिने त्यांच्यावर उपचार करून पाठपुरावा केला जाईल. उपचारानंतरही लठ्ठपणा कमी होत नसेल तर ‘बेरियाट्रिक सर्जरी’साठी रुग्णाला तयार करण्यात येणार आहे.
लठ्ठपणा हा एक आजार
लठ्ठपणातून येणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्यांना बहुसंख्य लोक तोंड देत आहेत. लठ्ठपणा हा एक आजार आहे. तो होण्यामागे काही विशिष्ट कारणे असतात. त्याच कारणांवर ‘डेडिकेटेड ओबेसीटी’ कक्षात उपचार केले जाईल. या कक्षासाठी स्वतंत्र कक्ष व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
डॉ. अभिमन्यू निसवाडे
अधिष्ठाता, मेडिकल