शंकरबाबा पापळकर यांनी डी.लिट केली यांना अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 11:40 PM2021-05-31T23:40:46+5:302021-05-31T23:43:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्रदान केलेली डी.लिट ही पदवी सुप्रसिद्ध समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्रदान केलेली डी.लिट ही पदवी सुप्रसिद्ध समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी मातृतुल्य सुनंदा वैद्य यांना अर्पण केली. अमरावती विद्यापीठाने शंकरबाबांच्या कार्याची दखल घेत त्यांना मानद डी.लिट ही पदवी बहाल केली. त्यानंतर सोमवारी त्यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते व विचारक स्व. मा. गो. वैद्य यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मातृतुल्य सुनंदा वैद्य यांना आपली पदवी अर्पण केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. मा. गो. वैद्य यांचे शंकरबाबा हे मानसपुत्र आहेत. यावेळी धनंजय वैद्य, रेवती वैद्य, श्रीनिवास वैद्य, विष्णुगुप्त वैद्य, आश्लेषा वैद्य, भारती जयंत कहू, ज्येष्ठ पत्रकार गजानन निमदेव उपस्थित होते. तद्नंतर नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या निवासस्थानी शंकरबाबांचा सत्कार सोहळा पार पडला.
हा अमरावती विद्यापीठाचा बहुमान : रवींद्र ठाकरे
अमरावतीला महसूल उपायुक्त, एसडीओ असतानापासून शंकरबाबांचे कार्य बघतो आहे. निराधार मुलांना त्यांनी आधार दिला. संत गाडगेबाबांचे कार्य ते पुढे नेत आहेत. त्यामुळे शंकरबाबांना डी.लिट देऊन अमरावती विद्यापीठाचाच बहुमान वाढला असल्याची भावना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.