सोलर इंडस्ट्रीजमधील स्फोटाची सखोल चौकशी करा, विधानपरिषदेत सदस्यांची मागणी

By योगेश पांडे | Published: December 18, 2023 05:40 PM2023-12-18T17:40:58+5:302023-12-18T17:42:01+5:30

शशिकांत शिंदे यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला. संबंधित कंपनीत याअगोदरदेखील असे प्रकार घडले आहेत.

Deep probe into explosion in solar industries, MLAs demand in Vidhan Parishad | सोलर इंडस्ट्रीजमधील स्फोटाची सखोल चौकशी करा, विधानपरिषदेत सदस्यांची मागणी

सोलर इंडस्ट्रीजमधील स्फोटाची सखोल चौकशी करा, विधानपरिषदेत सदस्यांची मागणी

नागपूर : ‘सोलर इंडस्ट्रीज’मध्ये झालेल्या स्फोटाचे पडसाद सोमवारी विधानपरिषदेतदेखील उमटले. या स्फोटाची सखोल चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली. तसेच या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावदेखील मांडण्यात आला. उपसभापतींनी स्थगन प्रस्ताव नाकारला असला तरी मंगळवारी सभागृहात या मुद्द्यावर नियम ९७ अंतर्गत चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे.

शशिकांत शिंदे यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला. संबंधित कंपनीत याअगोदरदेखील असे प्रकार घडले आहेत. राज्यात असे प्रकार वारंवार घडत असतानादेखील ठोस पावले उचलण्यात आलेली नाही. सरकारला माणसाच्या मृत्यूची किंमत नाही का असा सवाल करत शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी नेमण्याची मागणी केली. सोबतच कामगार विभागाचीदेखील चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीदेखील चौकशीवर भर दिला. अनेकदा औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना कंपनीतदेखील येऊ दिले जात नाही. 

विभागातील अधिकारी त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत नाहीत. त्यामुळे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांवरदेखील गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. सुटीच्या दिवशी कामगारांना कामावर बोलविणे ही आधुनिक वेठबिगारीच असल्याचा आरोप त्यांनी केला. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी हा प्रस्ताव नाकारला. मात्र माणसासाठी नियम असतात, नियमासाठी माणूस नसतो. त्यामुळे मंगळवारी नियम ९७ अंतर्गत या विषयावर चर्चेची त्यांनी तयारी दाखवली.
 

Web Title: Deep probe into explosion in solar industries, MLAs demand in Vidhan Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.