दीपक बजाजच्या वैद्यकीय तपासणीत हयगय
By admin | Published: October 28, 2016 02:47 AM2016-10-28T02:47:42+5:302016-10-28T02:47:42+5:30
जरीपटक्यातील सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव व महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचा मुख्याध्यापक
कारागृह अधिकाऱ्यांवर आरोप : विशेष न्यायालयात अर्ज दाखल
नागपूर : जरीपटक्यातील सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव व महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचा मुख्याध्यापक दीपक खूबचंद बजाजने त्याच्या स्वत:च्या आरोग्य तपासणीच्या बाबतीत कारागृह अधिकाऱ्यांकडून हयगय केली जात असल्याचा आरोप करून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
बजाज भ्रष्टाचार, फसवणूक व गैरव्यवहार प्रकरणात आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. बजाजला विविध आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहेत.
यामुळे विशेष न्यायालयाने बजाजची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश देऊन वैद्यकीय अहवाल मागवला होता. त्यानुसार बजाजची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर डॉक्टरने बजाजची नियमित वैद्यकीय तपासणी करीत राहणे आवश्यक असल्याचा अहवाल दिला. परंतु, कारागृह अधिकाऱ्यांनी या अहवालाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.
बजाजची नियमित वैद्यकीय तपासणी केली जात नाही. यामुळे त्याची प्रकृती खालावली आहे, असा दावा अर्जात करण्यात आला आहे. तसेच, यासंदर्भात कारागृह अधिकाऱ्यांना योग्य तो आदेश देण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. बजाजतर्फे अॅड. शशिभूषण वहाणे व अॅड. रसपालसिंग रेणू कामकाज पाहणार आहेत.(प्रतिनिधी)
दोषारोपांवर आक्षेप
दीपक बजाज व अन्य आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयात खटला प्रलंबित आहे. बजाजविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(१)(ई) व कलम १३(२) तर, भादंविच्या कलम ४६७, ४६८, ४७१, ४२०, १२०-ब व १६८ अंतर्गत दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. बजाजने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २१६ अंतर्गत विशेष न्यायालयात दुसरा अर्ज दाखल करून या दोषारोपांवर आक्षेप घेतला आहे. हे दोषारोप कायद्यानुसार नाहीत असे बजाजचे म्हणणे आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील कलम १३(१)(ई) आणि भादंवितील कलम १६८ व कलम १२०-ब अवैधपणे लावण्यात आले, असा दावा त्याने अर्जात केला आहे. मुलीच्या नावाने २५ लाख ७२ हजार ९०२ रुपयांची मालमत्ता आढळून आल्याचा आरोपही तथ्यहीन असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. अॅड. शशिभूषण वहाणे व अॅड. रसपालसिंग रेणू या अर्जाचेही कामकाज पाहणार आहेत.