एकवीरा देवी मंदिर कळसाच्या चोरी प्रकरणी सखोल चौकशी करा - दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:14 PM2017-12-18T23:14:19+5:302017-12-18T23:14:59+5:30
“कार्ला एकवीरा मंदिराच्या कळसाची चोरी ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेचा तातडीने तपास लावण्यात यावा. आवश्यकता पडल्यास या घटनेचा तपास सीआयडीकडे द्या. कार्ला देवस्थान ट्रस्टच्या लोकांना दहशतीखाली धमकावून वाळीत टाकण्याचे निन्दनीय कृत्य करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात तत्काळ गुन्हे दाखल करा,” असे आदेश आज गृह राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना दिले.
नागपूर : “कार्ला एकवीरा मंदिराच्या कळसाची चोरी ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेचा तातडीने तपास लावण्यात यावा. आवश्यकता पडल्यास या घटनेचा तपास सीआयडीकडे द्या. कार्ला देवस्थान ट्रस्टच्या लोकांना दहशतीखाली धमकावून वाळीत टाकण्याचे निन्दनीय कृत्य करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात तत्काळ गुन्हे दाखल करा,” असे आदेश आज गृह राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना दिले.
कार्ला मंदिराच्या कळसाच्या चोरीबाबत आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत प्रश्न मांडला होता. यावर सभापती ना. श्री. रामराजे निंबाळकर यांनी तातडीने बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज नागपूर विधानभवनात एकविरा मंदिर ट्रस्ट अध्यक्ष व माजी आमदार श्री. अनंत तरे व गृह विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये ते बोलत होते.
शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावर बोलताना सांगितले की, “कार्ला देवीच्या मंदिरात असे प्रकार होणे अत्यंत क्लेशदायक असून याबाबत पोलिसांनी दाखविलेली दिरंगाई नजरेआड करता येणार नाही. सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांनी याबाबत दिलेली माहिती अत्यंत विसंगत स्वरूपाची असून यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.” हे प्रकरण हाताळणाऱ्या व पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यावरदेखील कसलीही कारवाई न करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांचे त्वरीत निलंबन करण्याची मागणी एकविरा देवी ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी केली.
यावेळी मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दात या विषयी सूचना दिल्या. “याप्रकरणी तपासात दिरंगाई करीत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे. मंदिरातील चोरी ही अत्यंत गंभीर घटना आहे. चोरीच्या घटनेचा तपास २५ तारखेपर्यंत न झाल्यास त्यानंतर तो सीआयडी कडे सोपविण्यात यावा. एकविरा मंदिर परिसरात रस्ता रोको सारखे आंदोलने व मारामारी होऊनही याची पोलिसांनी तक्रार का घेतली नाही याची चौकशी होणे आवश्यक आहे. या परिसरातील मंदिर विश्वस्त विलास कुटे यांना वाळीत टाकण्याच्या घटनेची गंभीर दखल घेत याविषयी तत्काळ पोलीस तक्रार दाखल करावी आणि याबाबत दोषी असणारे प्रवीण कुटे व त्यांचे सहकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. कायदा व सुव्यवस्था पाळणे व ती कायम ठेवणे ही पोलिसांचीच जबाबदारी आहे त्यामुळे यात कोणतीही दिरंगाई होणार नाही याची काळजी घ्या.” असे ते म्हणाले.
या बैठकीमध्ये विधान परिषदेचे सभापती ना. श्री. रामराजे निंबाळकर यांनी या सर्व सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले व तत्काळ या प्रकरणी योग्य तो छडा लावण्याची अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव सतीश बढे, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, पोलीस उपविभागीय अधिकारी डी. डी. शिवथरे आदि अधिकारी उपस्थित होते.