दीपक निलावार यांचा बंगला ‘सील’ : कोट्यवधींच्या कर्जाचे हप्ते थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:07 PM2019-06-26T22:07:51+5:302019-06-26T22:17:03+5:30
कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची रक्कम थकीत असल्यामुळे शहरातील नामांकित बिल्डर दीपक निलावार यांच्या बंगल्याला बुधवारी ‘सील’ ठोकण्यात आले. वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी स्थित त्यांच्या बंगल्यावर नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत बँक अधिकाऱ्यांनी ‘सीलिंग’ची कारवाई पूर्ण केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईच्या वेळी निलावार कुटुंबीयदेखील उपस्थित होते, मात्र दीपक निलावार तेथून निघून गेले. बँकेच्या या कारवाईमुळे शहरातील बिल्डर्समध्ये खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची रक्कम थकीत असल्यामुळे शहरातील नामांकित बिल्डर दीपक निलावार यांच्या बंगल्याला बुधवारी ‘सील’ ठोकण्यात आले. वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी स्थित त्यांच्या बंगल्यावर नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत बँक अधिकाऱ्यांनी ‘सीलिंग’ची कारवाई पूर्ण केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईच्या वेळी निलावार कुटुंबीयदेखील उपस्थित होते, मात्र दीपक निलावार तेथून निघून गेले. बँकेच्या या कारवाईमुळे शहरातील बिल्डर्समध्ये खळबळ उडाली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार निलावार यांनी त्यांची कंपनी मे.रेवती कन्स्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपर्सच्या नावाने २०१७ मध्ये शिक्षक सहकारी बँकेतून २ कोटी ७८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांचे हे कर्ज ‘ओव्हरड्राफ्ट’ झाले. कर्ज घेतल्यापासूनच त्यांनी अनियमितपणे हप्ते भरले. ही रक्कम वाढून ५ कोटी ५० लाख इतकी झाली. कर्ज न फेडल्यामुळे बँकेकडून वारंवार सूचनादेखील देण्यात आली. ‘सिक्युरीटायझेशन अॅक्ट २००२’अंतर्गत त्यांना नोटीसदेखील बजाविण्यात आली. ६० दिवसांची मुदत संपल्यानंतर बँकेने अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. सुनावणीनंतर त्यांनी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना जप्तीचे आदेश दिले. बुधवारी जवळपास २ वाजताच्या सुमारास नायब तहसीलदार आभा वाघमारे आणि बँकेचे अधिकृत अधिकारी श्रीकांत तोडे, उपमहाव्यवस्थापक विवेक बापट, सीताबर्डी शाखेचे व्यवस्थापक मनोज चक्रधरे, माजी व्यवस्थापक प्रभाकर फुटे व इतर अधिकारी प्लॉट क्रमांक २६१, २६२ व २६३ येथे बनलेल्या पिरॅमिड टॉवर येथे पोहोचले. सुमारे तीन तास कारवाई चालली व निलावार यांच्या बंगल्याला ‘सील’ ठोकण्यात आले.
बँकेने तैनात केला ‘गार्ड’
कारवाई पूर्ण होईपर्यंत कुणालाही आत येण्याची परवानगी देण्यात आली नाही. कारवाई पूर्ण झाल्यानंतर बंगल्याच्या बाहेरील दारावरदेखील कुलूप लावण्यात आले. बँकेकडून निगराणीसाठी ‘गार्ड’देखील तैनात करण्यात आला आहे.