दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : खाते चौकशीऐेवजी वनविभागाची चौकशी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 11:56 PM2021-04-01T23:56:58+5:302021-04-01T23:58:09+5:30
Deepali Chavan suicide case हरिसाल येथील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाल चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी वन विभागाने चौकशी समिती गठित केली आहे. विशेष म्हणजे या घटनेमध्ये दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन झाले असताना व पोलिसांची चौकशी सुरू असताना वन विभागाने या दोन्ही अधिकाऱ्यांची खाते चौकशी करण्याऐवजी चौकशी समिती गठित केली, यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हरिसाल येथील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाल चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी वन विभागाने चौकशी समिती गठित केली आहे. विशेष म्हणजे या घटनेमध्ये दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन झाले असताना व पोलिसांची चौकशी सुरू असताना वन विभागाने या दोन्ही अधिकाऱ्यांची खाते चौकशी करण्याऐवजी चौकशी समिती गठित केली, यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटला मध्यवर्ती ठेवून ही समिती १६ मुद्द्यांवर चौकशी करणार आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) जी. साईप्रकाश यांनी ही समिती गठित केली आहे. ही नऊ सदस्यीय समिती प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती तंत्रज्ञान व धोरण) एम. के. राव यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली असून सहअध्यक्ष म्हणून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) विकास गुप्ता तसेच सदस्य वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा अय्यर (त्रिवेदी), विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) मेळघाट पीयूषा जगताप, अमरावती वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) ज्योती पवार, सामाजिक वनीकरणचे वन परिक्षेत्र अधिकारी कोकाटे, सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी किशोर मिश्रीकोटकर, तसेच सदस्य सचिवांनी ठरविलेला स्थानिक स्वयंसेवी संस्थेचा सदस्य आणि सदस्य सचिव म्हणून मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक) अमरावती प्रवीण चव्हाण यांचा समावेश आहे.
स्वत:ला गोळी मारून अंत करेपर्यंत टोकाचे पाऊल उचलणारी ही घटना दुर्दैवी असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) जी. साईप्रकाश यांनी म्हटले आहे. गुगामल येथील उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांचे निलंबन झाले असून गुन्हाही दाखल झाला आहे. असे असले तरी या घटनेच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना घडू नये, उपाययोजना सुचविल्या जाव्या, असलेल्या उपाययोजनेतील त्रुटी दूर व्हाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
ही समिती दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूपूर्व पत्राचा आधार घेऊन १६ मुद्द्यांवर चौकशी करणार आहे. विनोद शिवकुमार याने त्रास कसा दिला, अधिनस्तांसोबत गैरवर्तणूक कशी केली याची माहिती घेतली जाणार आहे. असे असले तरी ज्या १६ मुद्द्यांवर ही समिती चौकशी करणार आहे, ते लक्षात घेता ही चौकशी म्हणजे चव्हाण यांच्या मृत्यूपूर्व पत्राची उलटतपासणीच असल्यासारखे दिसत आहे.