दिवाळीतही तेवतो कर्तव्याचा दीप;  पोलीस, अग्निशमन दल, डॉक्टरांची दिवाळी ‘ड्युटी’वरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:03 AM2018-11-06T11:03:52+5:302018-11-06T11:04:49+5:30

दिवाळीला प्रत्येक जण आपापल्या परीने आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुमच्या आमच्यातल्याच ‘त्यांना’ मात्र कुटुंबासह दिवाळी साजरी करण्याची संधी मिळत नाही.

Deepavali also lays the duty of duty; Police, fire brigade, doctors' duty on Diwali 'Duty' | दिवाळीतही तेवतो कर्तव्याचा दीप;  पोलीस, अग्निशमन दल, डॉक्टरांची दिवाळी ‘ड्युटी’वरच

दिवाळीतही तेवतो कर्तव्याचा दीप;  पोलीस, अग्निशमन दल, डॉक्टरांची दिवाळी ‘ड्युटी’वरच

googlenewsNext
ठळक मुद्देअत्यावश्यक सेवांतील कर्मचारी सेवेतच 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी म्हणजे प्रकाशाची उधळण, उत्साहाची लगबग आणि भरभराटीचा आनंद! आशेचे, प्रकाशाचे गाणे गाणारा हा सण लहानमोठ्या सगळ्याचेच आयुष्य उजळून टाकतो. दिवाळीला प्रत्येक जण आपापल्या परीने आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुमच्या आमच्यातल्याच ‘त्यांना’ मात्र कुटुंबासह दिवाळी साजरी करण्याची संधी मिळत नाही. त्यांच्यासाठी दिवाळी म्हणजे नागरिकांची सेवाच. समाजातील नागरिकांना निर्धोकपणे सणाचा आनंद अनुभवता यावा याकरता ते ‘आॅन ड्युटी’ असतात. कुटुंबीयांसोबत घरी राहता येत नसले तरी सगळ््या समाजालाच एक परिवार मानून कर्तव्य बजावतांनाच ते दिवाळी साजरी करतात. पोलिस, अग्निशमन दल, सरकारी रुग्णालयांतील डॉक्टर यांसारख्या अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांच्या सुखाच्या क्षणांवर अनेकदा पाणी फेरले जाते. परंतु तरीदेखील त्यांच्या उत्साहात कुठेही कमी नसते हे विशेष.
दिवाळीचा सण साजरा करताना नागरिकांवर कुठलेही संकट येऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिसांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. उपराजधानीत पोलीस दलात सुमारे सहा ते सात हजार पोलीस कर्मचारी व अधिकारी आहेत. पूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या काळात घरी जाण्याचीदेखील उसंत मिळत नसे. परंतु गेल्या काही काळापासून स्थिती बरीच चांगली झाली आहे. तरीदेखील अनेक कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीच्या दिवशी घरी लक्ष्मीपूजन केलेले नाही. कर्तव्यावर असताना नागरिकदेखील अनेकदा दिवाळीच्या आनंदात सहभागी होण्याचा आग्रह करतात. अनेक जण तर इतर सहकाऱ्यांसाठीदेखील फराळाचे पदार्थ ‘पार्सल’ करून देतात. बच्चेकंपनीदेखील ‘पोलीस काका’ म्हणत आमच्याजवळ येतात तेव्हा आमच्या मुलांची आठवण तर येते, पण त्यांच्या समंजसपणाचे कौतुकदेखील वाटते असेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

इस्पितळातच दिवाळी
सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना तर सदैव तत्पर राहावे लागते. अगोदरपासून भरती असलेले रुग्ण, दिवाळीच्या काळात येणारे रुग्ण आणि अत्यवस्थ नागरिकांना उपचार मिळणे फारच गरजेचे असते. त्यामुळे दिवाळीच्या दिवशीदेखील कामावर जावेच लागते. जर एका दिवसाचा खंड पडला तर आनंद साजरा करण्याच्या मोहापायी कुणाचा तरी जीव धोक्यात येऊ शकतो याची जाणीव आम्हाला आहे व आमचे पहिले प्राधान्य हे रुग्णसेवेलाच असते असे मत अनेक डॉक्टर व परिचारिकांनी व्यक्त केले.

आगीपासून बचावासाठी सदैव तत्पर
पोलिसांप्रमाणेच अग्निशमन दलातील सर्वच कर्मचाऱ्यांनादेखील दिवाळी साजरी करता येणार नाही. परंतु त्याबद्दल त्यांना कोणतीही खंत नाही. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे दुर्घटना कधी घडेल याचा नेम नाही. जर आम्ही सुटीवर गेलो आणि कुठे आग लागली तर बचावासाठी समोर कोण येणार? कुटुंबाच्या संगतीत सण साजरा करण्याचा आनंद फार मोठा असतोच,सुरुवातीला पत्नी, मुले नाराजदेखील व्हायचे. परंतु आता त्यांना सवय झाली आहे. दिवाळीच्या काळात सुटी घेता येत नसली तरी जितक्या वेळ घरी असतो तेव्हा ‘फुल टू धमाल’ करण्याचाच प्रयत्न असतो. तसेच कार्यालयातदेखील दरवर्षी आपापल्या परीने सजावट करण्याचा व फराळ वाटण्याचा प्रयत्न असतो अशी भावना एका उपअधिकाऱ्याने व्यक्त केली.

घरात लक्ष्मी, कर्तव्यावर दुर्गा
दिवाळीच्या काळात अत्यावश्यक सेवांमधील महिला कर्मचारी या दुहेरी जबाबदारी पार पाडत असतात. कुटुंबातील ‘लक्ष्मी’ असलेली महिला कर्तव्यावर आल्यावर ‘दुर्गा’ बनतात. दिवाळीच्या काळातील खरेदी, घरचा फराळ, कुटुंबीयांच्या अपेक्षा, साफसफाई या सर्व गोष्टी करताना त्या वेळेवर ‘ड्युटी’ वरदेखील हजर होतात. अनेकदा दुहेरी जबाबदारी सांभाळताना कसरत होते, परंतु सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे वेळ निभावून जाते. कामावर असताना घरच्यांची व विशेषकरून मुलांची फार आठवण येते. अनेकदा डोळ्यात पाणी पण येते. पण आमच्या कामाचे महत्त्वदेखील आम्ही जाणून असल्याने लगेच सावरतो अशा भावना अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Deepavali also lays the duty of duty; Police, fire brigade, doctors' duty on Diwali 'Duty'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी