वन्यप्राण्यांसंदर्भात होणार सखोल संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:18 PM2019-04-04T23:18:17+5:302019-04-04T23:20:26+5:30
विदर्भातील जंगलांमधील वन्यप्राण्यांसंदर्भात सखोल संशोधन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वन विभागाने हाती घेतला आहे. त्यानुसार २०१९ ते २०२८ या कालावधीत वन्यजीवांचा सर्वांगीण अभ्यास केला जाणार आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते वनरक्षक पदापर्यंतचे सर्व स्तरातील कर्मचारी या संशोधनात सहभागी होणार आहेत. यासंदर्भात वन विभागाने वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी सामंजस्य करार केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील जंगलांमधील वन्यप्राण्यांसंदर्भात सखोल संशोधन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वन विभागाने हाती घेतला आहे. त्यानुसार २०१९ ते २०२८ या कालावधीत वन्यजीवांचा सर्वांगीण अभ्यास केला जाणार आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते वनरक्षक पदापर्यंतचे सर्व स्तरातील कर्मचारी या संशोधनात सहभागी होणार आहेत. यासंदर्भात वन विभागाने वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी सामंजस्य करार केला आहे.
गुरुवारी वन भवनात याबाबतच्या सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि संशोधकांची कार्यशाळा घेण्यात आली. तीन टप्प्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये आणि अभयारण्ये यामधील वाघ तसेच इतर प्राण्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. या प्राण्यांचे अधिवास, त्यांना उपलब्ध असलेली शिकार, त्यांच्या संचाराची क्षेत्रे, त्यांचे वर्तन अशा सर्व बाबींचा अभ्यास केला जाईल. या टप्प्यातील संशोधन १० वर्षांपर्यंत चालणार आहे. संशोधनाच्या दुसऱ्या भागात मोठ्या मांसभक्षी प्राण्यांचा अभ्यास चार वर्षांपर्यंत केला जाईल. मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांचा अभ्यास आणि त्या टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यांचा या अभ्यासात समावेश असेल. वाघांची वाढती संख्या, जंगलांची वाघ, बिबटे, अस्वल अशा प्राण्यांना सामावून घेण्याची क्षमता, नव्या जंगलांमध्ये वाघांचे स्थलांतर अशा गोष्टींचा अभ्यास केला जाईल. याशिवाय वन विभागाच्या वतीने संशोधनावर आधारित स्वतंत्र वेब पोर्टल तयार केले जाईल. संशोधन प्रकल्प आणि त्यासंबंधीची सर्व माहिती या पोर्टलवर टाकली जाईल. वन विभाग आणि वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यातील कराराला फेब्रुवारी महिन्यात अंतिम स्वरूप देण्यात आले. गुरुवारी नागपुरात सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि संशोधक यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत प्रकल्पाच्या विविध घटकांवर चर्चा करण्यात आली. हा संपूर्ण प्रकल्प राज्याच्या वन विभागाच्या वतीनेच राबविला जाणार आहे. त्यामुळे, अधिकाऱ्यांपासून वनरक्षकांपर्यंतचे विविध घटक संशोधनात प्रत्यक्ष भाग घेतील. दहा वर्षांचा प्रकल्प हा विदर्भात राबविला जाईल, तर चार वर्षांचा मांसभक्षींचा अभ्यास आणि वेब पोर्टल हे प्रकल्प संपूर्ण राज्यभराकरिता राबविले जातील. वन भवन येथे झालेल्या कार्यशाळेला भारतीय वन्यजीव संस्थेचे संचालक डॉ. व्ही. बी. माथूर, वन विभागाचे प्रमुख उमेश अग्रवाल, वन्यजीव विभागाचे प्रमुख नितीन काकोडकर तसेच विविध व्याघ्र प्रकल्पांचे आणि वनक्षेत्रांचे प्रमुख उपस्थित होते.