नागपूरच्या गोरेवाडा जंगलात हरणाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:19 PM2018-05-17T23:19:04+5:302018-05-17T23:19:23+5:30

गोरेवाडा वनक्षेत्राला लागून असलेल्या मनपा वॉटर प्लान्ट परिसरात एका हरणाची शिकार करण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली.

Deer hunting in Nagpur's Gorewada forest | नागपूरच्या गोरेवाडा जंगलात हरणाची शिकार

नागपूरच्या गोरेवाडा जंगलात हरणाची शिकार

Next
ठळक मुद्देमांस चोरून नेण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : गोरेवाडा वनक्षेत्राला लागून असलेल्या मनपा वॉटर प्लान्ट परिसरात एका हरणाची शिकार करण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली.
गोरेवाडा वॉटर प्लान्ट ते तलावाच्या काठाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना पाण्यात एका हरणाचा मृतदेह आढळून आला. हरणाचे तोंड, मागचे दोन पाय कापून चार भागामध्ये हरणाचा मृतदेह पडला होता. त्यामुळे एखाद्याने हरणाची शिकार करण्याची शंका निर्माण झाली. हरणाच्या पोटाचा भाग हा बिबट किंवा अन्य प्राण्याने खाल्ल्याचा अंदाजही वर्तविला जात आहे. परंतु ज्या पद्धतीने हरणाचे तोंड व पाय सफाईने कापण्यात आले आहे, त्यावरून हरणाचे मांस चोरण्याचा प्रयत्न झाल्याचेही नाकारले जाऊ शकत नाही. वन अधिकारी मात्र बिबट्याने शिकार केल्याचा दावा करीत आहे. गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या मनपाच्या परिसरात बिबट्याची उपस्थिती अनेकदा आढळून आली आहे. बिबट्याने हरणाची शिकार करून त्याच्या पोटाचा भाग खाल्ला असावा आणि त्यानंतर कुणीतरी कुऱ्हाड किंवा इतर धारदार शस्त्राने हरणाला कापून मांस घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असेल. परंतु मांस खराब झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने मांसाचे तुकडे तलावाच्या काठावरच फेकले असावे, असा अधिकाºयांना संशय आहे.
पंचनामा करून केले सूचित
गोरेवाडाचे आरएफओ सुनील सोनटक्के यांनी सांगितले की, सूचना मिळाल्यावर वन कर्मचाऱ्यासह ते घटनास्थळी पोहोचले. तिथे हरणाचा मृतदेह तुकड्यात पडला होता. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. परंतु संबंधित क्षेत्र हे मनपा वॉटर प्लान्टच्या अधिकार क्षेत्रात येते. उपरोक्त क्षेत्र आणि पूर्ण शहरी परिसर प्रादेशिक वन विभागाच्या सेमिनरी हिल्स रेंज अंतर्गत येत असल्याने त्यांना सूचना देऊन बोलावण्यात आले होते. नियमानुसार घटनेचा पंचनामा आणि पीआर फाडण्याची जबाबदारी सेमिनरी हिल्सच्या कर्मचाऱ्याची होती. मृतदेहाचे अंत्यसंस्कारही करायला हवे होते. परंतु सेमिनरी हिल्सचे कर्मचारी हरणाचा मृतदेह मनपा कर्मचाऱ्याच्या भरवशावर सोडून निघून गेले. गोरेवाडा व मनपा कर्मचाऱ्यानी अंत्यसंस्कार केले.
आमचेही कर्मचारी होते उपस्थित
सेमिनरी हिल्सचे आरएफओ विजय गंगावणे यांनी सांगितले की, घटनास्थळाला लागूनच गोरेवाडा जंगलाची हद्द आहे. मनपा क्षेत्राला लागून सेमिनरी हिल्सचाही परिसर येतो. आम्हीही पंचनामाची कारवाई केली. मृतदेहाच्या अंत्यसंस्काराच्यावेळी सेमिनरी हिल्सचे कर्मचारीही उपस्थित होते. हरणाला कापून घेऊन जाण्याचा प्रयत्न झाल्याचे पाहता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अंत्यसंस्कारासाठी टाळाटाळ करण्यात आली. अखेर गोरेवाडा वनक्षेत्रातील दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने मनपा कर्मचाऱ्यानी खड्डा खोदून हरिणीच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले.

Web Title: Deer hunting in Nagpur's Gorewada forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.