कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:31+5:302021-03-21T04:08:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : वाट भरकटलेल्या हरणावर माेकाट कुत्र्यांनी हल्ला चढवित लचके ताेडून त्याला गंभीर जखमी केले. वेळीच ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : वाट भरकटलेल्या हरणावर माेकाट कुत्र्यांनी हल्ला चढवित लचके ताेडून त्याला गंभीर जखमी केले. वेळीच उपचार न मिळाल्याने त्या हरणाचा मृत्यू झाला. ही घटना कामठी तालुक्यातील कामठी-कळमना मार्गावरील न्यू येरखेडा शिवारात शनिवारी (दि. २०) सकाळी उघडकीस आली.
कामठी शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्राच्या मागे झुडपी जंगल असून, त्या जंगलात हरणांचे कळप वास्तव्याला आहेत. कळपातील एक हरिण शुक्रवारी (दि. १९) मध्यरात्री पाण्याच्या शाेधात वाट भरकटले आणि ते नागरी वस्तीच्या दिशेने आले. त्यातच त्या हरणावर माेकाट कुत्र्यांची नजर पडल्याने त्यांनी हरणावर हल्ला चढविला. ते हरिण जीवाच्या आकांताने पळत न्यू येरखेडा (ता. कामठी) शिवारात आले. तिथे ते कुत्र्यांच्या तावडीत सापडले.
दरम्यान, शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास या भागातून जाणाऱ्या काही नागरिकांना जखमी अवस्थेतील ते हरिण दिसले. त्यांनी लगेच कामठी (नवीन) पाेलिसांसाेबत वन कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी लगेच घटनास्थळ गाठून पाहणी केली. ताेपर्यंत त्या हरणाचा मृत्यू झाला हाेता. पाेलिसांनी पंचनामा करून मृत हरिण वन कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले.
...
आठवडाभरातील दुसरी घटना
कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू हाेण्याची ही आठवडाभरातील दुसरी घटना हाेय. सैनिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातील झुडपी जंगलात माेठ्या प्रमाणात हरणांचे कळप आहे. याच भागातून कन्हान नदी वाहात असल्याने त्यांना खायला चारा व प्यायला मुबलक पाणीदेखील मिळते. मात्र, कुत्र्यांच्या हल्ल्यात या हरणांचा मृत्यू हाेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने वनविभागाने यावर याेग्य व कायमस्वरूपी उपाययाेजना करणे गरजेचे आहे.