उमरेड-नागपूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:32 AM2018-01-18T11:32:06+5:302018-01-18T11:32:30+5:30
नागपूर-उमरेड महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नर चितळाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना महामार्गावरील चक्रीघाटलगतच्या हेटी शिवारात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर-उमरेड महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नर चितळाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना महामार्गावरील चक्रीघाटलगतच्या हेटी शिवारात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. दिवसेंदिवस कमी होत असलेल्या बाराशिंगे चितळाचा मृत्यू झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.
उमरेड-नागपूर महामार्गावरील हेटी परिसरात सदर चितळ रस्ता ओलांडत असताना अज्ञात भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. यात चितळ ठार झाले. सदर चितळ महामार्गालगतच्या पारडगाव तलावाच्या दिशेने जात होते, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली.
याबाबत माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक मंगेश ठेंगडी, उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. बी. वाघ, मकरधोकडा क्षेत्र सहायक इद्रिस शेख यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर उटी परिसरातील नर्सरीमध्ये पशुधन पर्यवेक्षक पी. एम. कुमरे यांनी मृत नर चितळाचे शवविच्छेदन केले. या चितळाची लांबी १९० सेमी असून त्यांची बाराशिंगे शाबूत होती. याप्रकरणी उत्तर उमरेड वनविभागाने अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.