शहर विद्रूप करणाऱ्या २३,९७० जणांवर कारवाई : अडीच कोटींचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 09:07 PM2019-09-20T21:07:13+5:302019-09-20T21:10:10+5:30
शहर विद्रूप करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने मागील तीन वर्षांत विद्रुपीकरण करणाऱ्या २३ हजार ९७० व्यक्तींवर कारवाई करून २ कोटी ५० लाखांचा दंड वसूल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नियमांचे उल्लंघन करून शहर विद्रूप करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने मागील तीन वर्षांत सार्वजनिक ठिकाणी घाण व विद्रुपीकरण करणाऱ्या २३ हजार ९७० व्यक्तींवर कारवाई करून २ कोटी ५० लाखांचा दंड वसूल केला आहे.
नागरिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवावे, नियमांचे पालन करावे, लोकसहभागातून शहराचे सौंदर्य वाढवावे, यासाठी महापालिके तर्फे वेळोवेळी आवाहन केले जाते. सोबतच लोकांच्या वाईट सवयींवर निर्बंध घालण्यासाठी ११ डिसेंबर २०१७ रोजी महापालिकेच्या स्वच्छता विभागांतर्गत उपद्रव शोध पथकाची नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीला यात ४१ माजी सैनिकांचा समावेश होता. आता ही संख्या ८७ झाली आहे. यात एक पथक प्रमुख, १० झोन स्क्वॉड लीडर आणि ७६ सुरक्षा सहायक आदींचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन अथवा सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांना उपद्रव शोध पथकातर्फे नोटीस जारी केली जाते. संबंधितानी निर्धारित वेळेत कार्यवाही न केल्यास दोषीला दंड आकारला जातो. महापालिकेच्या निर्णयानुसार विविध २१ उपद्रवासाठी पथकाकडून दंड आकारण्यात येतो. सार्वजनिक रस्ता, फूटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी विनापरवानगी बांधकाम साहित्य साठविल्यास नोटीस बजावली जाते. ४८ तासात ते न हटविल्यास दंड आकारला जातो. अशा स्वरुपाचा १ कोटी १८ लाख ७८ हजार इतका दंड वसूल केला आहे. इतर उपद्रवापोटी २३ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांकडून ७८ हजार ५०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर लघवी करणाऱ्यांकडून १ लाख ९४ हजार ३००, हातगाड्या, स्टॉल्सवाल्यांकडून परिसरात घाण केल्याप्रकरणी ९ लाख ६३ हजार ९०० रुपये, रस्ता, फूटपाथ, मोकळ्या जागांवर कचरा टाकणाऱ्यांकडून ३९ हजार, दुकानदारांकडून ५ लाख ३२ हजार ६०० रुपये, रस्ता, मोकळ्या जागांवर कचरा टाकणाऱ्या शैक्षणिक संस्थांनाकडून ५ लाख ६० हजार, दवाखाने, इस्पितळांकडून १ लाख ९१ हजार, मॉल, उपहारगृहे, लॉजींग, बोर्डिंग हॉटेल्स, थिएटर, मंगल कार्यालये, कॅटरर्स यांच्याकडून ९ लाख ८८ हजार रुपये, विनापरवानगी शहरात जाहिरात फलक लावणाऱ्यांकडून ३६ हजार ५०० रुपये, रस्त्यावर मंडप टाकणाऱ्यांकडून ६ लाख ६५ हजार ३०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणाºयांकडून १ लाख ४१ हजार रुपये, कचरा मोकळ्या जागांवर टाकणाऱ्या चिकन, मटन सेंटरकडून १ लाख ३८ हजार ५०० रुपये, कचºयात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांकडून १ लाख ६९ हजार, वर्कशॉप, गॅरेज व्यावसायिकांकडून ६ लाख ९१ हजार असा एकूण २ कोटी ६६ लाख २४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्लास्टिक जप्तीपोटी शासन नियमानुसार आकारलेल्या दंडाची रक्कम ४४ लाख एक हजार ५०० रुपये इतकी आहे.
नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
नागपूर शहर संपूर्ण देशात सुंदर शहर म्हणून ख्यातिप्राप्त होत आहे. आपले शहर हिरवे, सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यात नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याकडून कुठलाही उपद्रव होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी, उपद्रव आढळल्यास त्वरित महापालिकेचे उपद्रव शोध पथक किंवा स्वच्छता विभागाकडे माहिती द्यावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार व आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.