मेट्रोच्या मालमत्तेचे विद्रुपीकरण, दोषींना १० वर्षांची शिक्षा : नागरिकांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 09:07 PM2019-11-29T21:07:20+5:302019-11-29T21:10:13+5:30
गेल्या काही दिवसात समोर आलेल्या विविध घटनेत मेट्रो पिलर, स्टेशन, सुरक्षा भिंत, पिलरमधील दुभाजक इत्यादींवर रंगरंगोटी करणे, पोस्टर चिकटवणे व जाहिराती लिहिणे या सारखे गैरप्रकार होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही दिवसात समोर आलेल्या विविध घटनेत मेट्रो पिलर, स्टेशन, सुरक्षा भिंत, पिलरमधील दुभाजक इत्यादींवर रंगरंगोटी करणे, पोस्टर चिकटवणे व जाहिराती लिहिणे या सारखे गैरप्रकार होत आहेत. मेट्रोच्या मालमत्तेचे विद्रुपीकरण कुणीही करू नये, यासाठी सातत्याने महामेट्रोतर्फे विविध माध्यमातून सूचना करण्यात येत आहे. मेट्रोशी निगडित कोणत्याही बांधकामांवर असे गैरप्रकार आढळून आल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी कायद्यांतर्गत १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
देश-विदेशात नागपूर शहराचे वैभव दर्शविणारा नागपूर मेट्रो प्रकल्प रहिवाशांसाठी गौरवास्पद बाब ठरली आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी नागपूर मेट्रो आकर्षणाचे केंद्र ठरत असून शहराची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख ठरली आहे.
संस्थांसाठी कार्य करणारे तसेच सर्वसामान्य नागरिकांना मेट्रो प्रकल्पांतर्गत मालमत्तेचे व बांधकामांचे (मेट्रो पिलर्स, रेल्वे ट्रॅक, भुयारी मार्ग, स्टेशन इमारत, व्हायाडक्ट) रंग, पोस्टर्स, बॅनर, होर्डिंग किंवा इतर साधनांचा वापर करून विद्रुपीकरण करणे मेट्रो रेल्वे (ऑपरेशन आणि मेंटेनन्स) अधिनियम २००२ च्या कलम ७८ अंतर्गत प्रतिबंधित आहे. या कायद्यानुसार कुणीही या सार्वजनिक संपत्तीचे विद्रुपीकरण केल्यास किंवा करताना आढळल्यास त्याच्यावर नियमानुसार मेट्रो अधिकारी अथवा पोलीस अधिकाऱ्यांतर्फे वॉरंट किंवा नोटीस बजावत अटकेची कारवाई केली जाईल. कायद्यानुसार यात दोषींवर १० वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
महाराष्ट्र संपत्ती प्रतिबंधक मालमत्ता अधिनियम १९९५ चे कलम ३ अंतर्गत सार्वजनिक मालमत्तेवर व बांधकामाच्या ठिकाणी, तेथील जागेवर होणारी विटंबना कायद्याने अमान्य आहे. या अधिनियमान्वये संबंधित व्यक्ती, कंपनी, कॉपोर्रेट संस्था तसेच संबंधित अधिकारी किंवा व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्ती यांच्या संमतीशिवाय गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून शिक्षा दिली जाऊ शकते. त्यानुसार नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या मालमत्तेचे विद्रुपीकरण करताना आढळून आल्यास दोषींवर तीन महिने कारावास, २००० रुपये दंड अथवा दोन्ही असे शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे असे कुठलेही विद्रुपीकरण दिसून आल्यास त्वरित महा मेट्रोशी संपर्क करावा, असे आवाहन नागपूर मेट्रोने नागरिकांना केले आहे.