पंतप्रधानांच्या बॅनरचे विद्रुपीकरण, कुणाल राऊतला अटक
By योगेश पांडे | Published: February 5, 2024 12:03 AM2024-02-05T00:03:56+5:302024-02-05T00:04:22+5:30
जिल्हा परिषदेतील बॅनर प्रकरण तापले : काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून विद्रुपीकरणाच्या कृतीचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या कार्यालय परिसरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरचे विद्रुपीकरण केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी रविवारी अटक केली. सदर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यांना कुही येथून अटक करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्या या कृतीचा निषेध केला आहे.
विकसित भारत संकल्पना यात्रेच्या प्रचार-प्रसारासाठी जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात ३० दिवसांअगोदर दोन बॅनर लावले होते. बॅनरवर वरच्या बाजूला ‘मोदी सरकारची हमी’ आणि खालच्या बाजूला ‘आपला संकल्प विकसित भारत’ असे नमूद केले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोदेखील होता. शनिवारी सुटीचा दिवस असताना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास कुणाल राऊत व ३० ते ४० अज्ञात इसम शासकीय इमारतीच्या परिसरात शिरले. त्यांनी दोन्ही बॅनर्सचे विद्रुपीकरण केले. ‘मोदी’ शब्दाऐवजी ‘भारत’ असे स्टीकर चिपकविले व त्यानंतर काळ्या पेंटने पंतप्रधानांच्या फोटोची विटंबना केली. या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यांना कुहीतून रविवारी अटक करण्यात आली. त्यांची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली.
आधी बजावली नोटीस, कुहीतून अटक
रविवारी सकाळी राऊत यांना माहिती पत्र देऊन संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी सोमवारी दुपारी १२ वाजता पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्याचा दावा एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र सायंकाळी त्यांना कुहीतून अटक करण्यात आली. याविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
काँग्रेसच्या जि. प. पदाधिकाऱ्यांकडून विद्रुपीकरणाचा निषेध
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी या विद्रुपीकरणाचा निषेध करत कुणाल राऊत यांना घरचाच अहेर दिला आहे. या घटनेची माहिती आम्हाला मिळतात आम्ही प्रशासनाला फोन करून असे कृत्य कोणी केले याची चौकशी करून उचित अशी कारवाई करावी, अशी भूमिका मांडली. पंतप्रधान हे कुठल्याही पक्षाचे नाही तर ते देशाचे आहेत. ते एका संविधान पदावर बसलेले आहेत. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या लोकांचे नागपूर जिल्हा परिषद व काँग्रेसदेखील समर्थन करत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सदर पोलिस ठाण्याचा अजब कारभार
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात सदर पोलिस ठाण्यातून मात्र वेगळीच भूमिका घेण्यात आली. तेथे १०:३० वाजता फोन केला असता महिला कर्मचाऱ्यांनी फोनवर माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर फोन बराच वेळ तसाच ठेवून दिला. बराच वेळ रिसिव्हर काढून ठेवलेल्या स्थितीत होता. त्यामुळे पोलिस ठाण्यात संपर्कच होऊ शकत नव्हता व ‘फोन बिझी’ असल्याचेच दर्शविल्या जात होते.