नागपुरात औषधांपासून मनोरुग्ण वंचित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:06 AM2018-04-10T00:06:34+5:302018-04-10T00:06:46+5:30
दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. मनोरुग्णांवर तातडीने योग्य औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. मात्र, सरकारी अनास्थेमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) केवळ १० टक्केच औषधी आहेत, यातही अत्यंत आवश्यक असलेले ‘लोराझेपाम’, ‘डाईझेपाम’ व ‘क्लोनाझेपाम’ औषधेच नाहीत. विशेष म्हणजे, रुग्णालयात नसलेली औषधे लिहून देणे हे नियमबाह्य असल्याने रुग्ण औषधांपासून वंचित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. मनोरुग्णांवर तातडीने योग्य औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. मात्र, सरकारी अनास्थेमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) केवळ १० टक्केच औषधी आहेत, यातही अत्यंत आवश्यक असलेले ‘लोराझेपाम’, ‘डाईझेपाम’ व ‘क्लोनाझेपाम’ औषधेच नाहीत. विशेष म्हणजे, रुग्णालयात नसलेली औषधे लिहून देणे हे नियमबाह्य असल्याने रुग्ण औषधांपासून वंचित आहेत. औषधेच नसल्याने मनोरुग्णांवर उपचार होणार कसा, हा प्रश्न आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या मनोरुग्णांची संख्या मोठी आहे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज २५० वर रुग्ण येतात. यातील बहुसंख्य रुग्णांवर महिनोन्महिने उपचार करावे लागतात. गरीब मनोरुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे परवडत नसल्याने त्यांच्यासाठी हे रुग्णालय आशेचा किरण आहे. परंतु लालफितशाहीचा मनमानी कारभार, अपुरा निधी, डॉक्टरांची कमतरता, पर्यायी उपचारांची वानवा अशा त्रुटींमुळे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. यातच गेल्या महिन्यापासून आवश्यक व तातडीने लागणारी औषधेही नसल्याने मनोरुग्णांचे हाल होत आहेत. सूत्रानुसार, रुग्णालय प्रशासनाने औषधांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला. परंतु आता औषधे खरेदीचे सर्व अधिकार ‘हाफकिन’ कंपनीला दिले असून, त्यांच्याकडून अद्यापही पुरवठा झाला नाही. स्थानिक पातळीवर औषधे खरेदीसाठीही अडचणी येत असल्याची माहिती आहे.
-डॉक्टरांना औषधे लिहून देताही येत नाही
रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या ८० टक्के रुग्णांना औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी, रुग्णांवर कसे उपचार करावेत, असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. रुग्णालयात नसलेली औषधे बाहेरून विकत घेण्यासाठी लिहूनही देता येत नाही, असे केल्यास रुग्ण ‘१०४’ क्रमांकावर तक्रारी करू शकतात. यामुळे रुग्ण रुग्णालयात येऊनही उपचाराविनाच राहात आहेत.