कार लोनच्या नावे फसवणूक, अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Published: July 30, 2016 02:25 AM2016-07-30T02:25:34+5:302016-07-30T02:25:34+5:30

कार लोनच्या नावे बँकांची ३० लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या एका इसमाचा अटकपूर्व जामीन अर्ज पहिले ...

Defective fraud, anticipatory bail in the name of car loan | कार लोनच्या नावे फसवणूक, अटकपूर्व जामीन फेटाळला

कार लोनच्या नावे फसवणूक, अटकपूर्व जामीन फेटाळला

Next

न्यायालय : ३० लाखांचा गंडा घालण्याचे प्रकरण
नागपूर : कार लोनच्या नावे बँकांची ३० लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या एका इसमाचा अटकपूर्व जामीन अर्ज पहिले तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
मोहम्मद अब्दुल जावेद मोहम्मद अब्दुल राशीद (३३), असे आरोपीचे नाव असून तो सदरच्या छिंदवाडामार्गावरील आकार बिल्डिंग, चिटणवीस ले-आऊट येथील रहिवासी आहे.
प्रकरण असे, आरोपी मोहम्मद अब्दुल जावेद याने शेवरले कंपनीची कार खरेदी करण्यासाठी २० लाख रुपयांच्या कर्जाकरिता काटोल मार्गावरील युनियन बँकेत अर्ज केला होता. या बँकेचे क्रेडिट मॅनेजर हनमंत जनबंधू यांनी कर्जसंबंधी सर्व कागदपत्रांची तपासणी करून २० लाखांचे कर्ज मंजूर केले होते. बँकेने ५ डिसेंबर २०१३ रोजी २० लाख रुपयांचा डिमांड ड्राप्ट कामठी रोड वांजरा ले-आऊट येथील स्टार मोटर्सच्या नावे जारी केला होता. अर्थात हा डीडी मोहम्मद अब्दुल जावेद याला दिला होता. जावेद याने याच बँकेतून फोर्स वन हे चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणखी एक कर्ज मंजूर करून घेतले होते. त्याने श्री मोटर्सच्या नावे १० लाख ९० हजाराचा दुसरा डीडी प्राप्त केला होता.
प्रत्यक्ष जावेद याने मोटारगाड्यांच्या या दोन्ही डिलर्सच्या नावे बनावट सही व शिक्क्यानिशी कोटेशन प्राप्त करून दोन्ही कर्ज मंजूर करून घेतले होते. त्याने या दोन्ही डिलर्सकडून कोणतेही वाहन खरेदी केले नव्हते. कॉर्पोरेशन बँकेत स्टार मोटर्स आणि श्री मोटर्सच्या नावाने बनावट खाते उघडले होते. शाहीद ए खान आणि भूषण नंदकिशोर चरडे यांना मालक दाखवले होते. दोन्ही डीडी वटवून युनियन बँकेची फसवणूक केली होती.
ही बनवाबनवी जनबंधू यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यावरून जावेद आणि साथीदारांविरुद्ध भादंविच्या ४६८, ४७१, ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जावेदने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता प्रकरण गंभीर असल्याने तो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील वसंत नरसापूरकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Defective fraud, anticipatory bail in the name of car loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.